दिलीप मोहिते - विटा खानापूर तालुक्यात वाळूअभावी अनेक शासकीय कामांना ब्रेक लागला असून, वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांची विकास कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, विटा शहरासह खानापूर तालुक्यातील खासगी बांधकामेही रेंगाळली असल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात वाळू ठेक्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळू उपसा व वाहतुकीस बंदी असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी खासगीसह शासकीय कामेही संबंधित ठेकेदारांनी बंद ठेवल्याने कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास मार्च एंडच्या तोंडावर ठेकेदारही अडचणीत येण्याचे संकेत आहेत. खानापूर तालुक्यात येरळा नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. सध्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नसल्याने वाळू उपसा बंद आहे. जो वाळूची तस्करी करून वाळू वाहतूक करीत असेल, तो मात्र यातून मोठ्या प्रमाणात मालामाल होत असल्याची चर्चा आहे. येरळा नदीपात्राच्या कार्यक्षेत्रातील हिंगणगादे, कान्हरवाडी, चिखलहोळ, माहुली, भाळवणी, कमळापूर, बलवडी (भा.) यासह अन्य ठिकाणांहून वाळू उपशासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने रितसर परवाना दिला जातो. परंतु, परवाना बंद होऊन आठ ते नऊ महिने झाले तरी वाळू उपसा सुरू झाला नाही. त्यामुळे ठेकेदारांसह खासगी बांधकामधारकांना वाळू मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे ठप्प झाली आहेत. खानापूर तालुक्यात तालुका कृषी विभागाच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आरसीसी सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. परंतु, या कामांनाही वाळू मिळत नसल्याने ही कोट्यवधी रुपयांची विकास कामे पैसे असूनही ठप्प आहेत, तर विटा शहरातील सेंट्रिंग व परप्रांतीय मजुरांवर सरकारी व खासगी बांधकामे थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे.जिल्हा प्रशासनाने कृष्णा नदीपात्रातील वाळूचा लिलाव ९ फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लिलाव होण्यापूर्वी येरळा नदीपात्रातून वाळू उपसा सुरू झाल्यास त्याचा परिणाम लिलाव प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तालुक्यातील वाळू उपशासाठी रितसर परवानगी मिळेल, असा अंदाज एका महसूल कर्मचाऱ्याने व्यक्त केला.मजुरांवर उपासमारीची वेळ...खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय बांधकाम मजूर स्थायिक झाले आहेत. त्यात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के बांधकाम मजूर एकट्या विटा शहरात आहेत. नेवरी नाका, शिवाजी चौक, चौंडेश्वरी मंदिर चौक, तासगाव नाका, विवेकानंदनगर, शाहूनगर, डॉक्टर कॉलनी यासह शहराच्या अन्य भागात हे मजूर सध्या राहात आहेत. परंतु, वाळूअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून या मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शासकीय विकासकामेही सुरू आहेत. पण वाळू मिळत नसल्याने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांनाही ‘ब्रेक’ लागला आहे.
वाळूअभावी कोट्यवधींची विकास कामे ठप्प
By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST