डेंग्यूचा डंख छोटा पण धोका मोठा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:44+5:302020-12-05T05:07:44+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची साथ नियंत्रणात असताना गेल्या महिन्याभरात डेंग्युसदृश्य साथीने डोके वर काढले आहे. पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यात डेंग्यू ...

डेंग्यूचा डंख छोटा पण धोका मोठा..
सांगली : जिल्ह्यात कोरोनाची साथ नियंत्रणात असताना गेल्या महिन्याभरात डेंग्युसदृश्य साथीने डोके वर काढले आहे. पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. सध्या १५० हून अधिक रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्युचा डंख छोटा असला तरी त्याचा धोका मात्र मोठा आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. याच काळात अवकाळी पावसानेही संपूर्ण जिल्ह्याला झोडपले होते. पाऊस थांबताच डासांचे प्रमाणही वाढले. त्यापाठोपाठ डेंग्युसदृश्य रुग्णांची संख्याही वाढत गेली. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात १३८ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तत्पूर्वी एप्रिल ते जुलैपर्यंत डेंग्यु रुग्णांची संख्या कमी होती. सरासरी ३० ते ४० डेंग्युचे रुग्ण सापडत होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जवळपास १५० हून अधिक रुग्ण उपचाराखाली आहेत.
महापालिका क्षेत्रात दरमहा २० ते २५ डेंग्यू रुग्ण आढळून येत आहे. हा आकडा पालिका दप्तरी नोंद असला तरी त्यापेक्षाही अधिक संख्या असल्याचे सांगितले जाते. महापालिकेने कोरोनाच्या काळात डेंग्यु व इतर साथीच्या आजाराचेही सर्वेक्षण केले होते. घरोघरी पथके पाठवून डेंग्यु आळी निर्मुलनाची मोहिम हाती घेतली होती. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात सर्वे सुरू आहे.
चौकट
खासगी रुग्णालयाकडून अल्प प्रतिसाद
डेंग्युची लक्षणे दिसताच रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो. आधी त्याची कोरोना चाचणी केली जाते. मगच खासगी रुग्णालयाकडून त्याला ॲडमीट करून घेतले जात आहे. खासगी रुग्णालयातील रुग्णांची माहिती जिल्हा व महापालिका प्रशासनाला मिळत नाही. काही मोजकीच रुग्णालये डेंग्यु रुग्णांची माहिती देत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
डेंग्युच्या साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ग्रामीण भागात हिवताप अधिकारी तर शहरात महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छ पाण्याचे साठे शोधून ते नष्ट करण्याची मोहिम वर्षभर सुरू असते. आताही सर्वेक्षण व इतर उपाय केले जात आहेत. - डाॅ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक