सांगलीत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीविरोधी अध्यादेश रद्द करून तत्काळ न्याय द्यावा, यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यांनी सांगितले की, आरक्षणाबाबत विशेष अनुमती याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. शासनाने ७ मेच्या अध्यादेशाद्वारे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती आरक्षण बंद करून घटनात्मक अधिकार डावलले आहेत. अध्यादेश रद्द करून तत्काळ पदोन्नती देण्यात यावी.
२६ जून या आरक्षणदिनी शासन निर्णय रद्द करून पुन्हा आरक्षण देण्याचा सुधारित आदेश काढावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मडावी यांनी दिला. महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदने देण्यात आली. सांगलीत मडावी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सचिव बाबासाहेब माने, उपाध्यक्ष महेंद्र येलुरकर, बाजीराव प्रज्ञावंत, प्रमोद काकडे, दीपक बनसोडे, रमेश सोनवणे, कुमार कांबळे, दयानंद सरवदे, सुरेश कोळी, बापू कोळी, अभिजीत कांबळे, आदी उपस्थित होते.