सांगलीत भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा
By Admin | Updated: September 11, 2014 00:08 IST2014-09-10T23:05:12+5:302014-09-11T00:08:43+5:30
ठेकेदाराचे दुर्लक्ष : वीस कोटीपैकी दोन वर्षात साडेपाच कोटी खर्च

सांगलीत भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा
अशोक डोंबाळे - सांगली -वीजचोरी, गळती कमी करून सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित वीज देण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे. कधी महापालिका प्रशासनाचा अडथळा, तर कधी ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षात केवळ साडेपाच कोटीचा निधी खर्च झाला आहे. ठेकेदारामुळे पंधरा कोटींचे काम खोळंबले आहे. सांगली, मिरज, कपवाड आणि बामणोली परिसरात भुयारी वीज प्रकल्पासाठी महावितरणने जानेवारी २०१२ मध्ये ७४ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून महापालिका क्षेत्रासह बामणोली येथे अति उच्चदाब वाहिनीचे पंधरा किलोमीटर आणि उच्चदाब वाहिनीचे १८ किलोमीटर काम केले आहे. ३३४ ठिकाणी नवीन रोहित्रे बसविल्यामुळे शहरातील वीज गळतीला काही प्रमाणात लगाम बसला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात भुयारी विद्युत केबल टाकणे, शिंदेमळा येथे उपकेंद्र, खणभागातील रिसाला रोड येथे दहा एमव्हीए क्षमतेचा नवीन रोहित्र बसविण्यासह विविध कामांसाठी १९ कोटी ३९ लाखांचा निधी जानेवारी २०१२ मध्ये मंजूर झाला आहे. या कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. रिसाला रोड येथील दहा एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यासह शहरातील ३५ ठिकाणी नवीन रोहित्रे बसविली. वीज वितरण करणाऱ्या १४० रोहित्रांची क्षमता वाढवायची होती. यामध्ये आतापर्यंत ९० वीज वितरण करणाऱ्या रोहित्रांची क्षमता वाढविली असून उर्वरित काम अपूर्ण आहे. या सर्व कामावर गेल्या दोन वर्षात केवळ पाच कोटी ५० लाखांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित कामे दोन वर्षात पूर्ण झाली नाहीत. उर्वरित पंधरा कोटींचा निधी अखर्चित आहे.
भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, ठेकेदाराकडूनच विलंब झाला आहे, म्हणूनच काम थांबले असून त्याला काम पूर्ण करण्यासाठी दोन ते तीनवेळा समज दिली आहे. सध्या त्याने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
डिसेंबर २०१४ पर्यंत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शहर विभागाचे कार्यकारी अभियंता अजितकुमार कागी यांनी दिला आहे. ठेकेदाराने कामास विलंब केल्यामुळे दोन ते अडीच वर्षात भुयारी विद्युत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही.
महापालिकेकडूनही भुयारी वीज प्रकल्प टाकण्यासाठीच्या खोदकामास मंजुरी वेळेत मिळाली नाही. काही तांत्रिक मंजुरीलाही अडचणी असल्यामुळे भुयारी वीज प्रकल्पाचे काम खोळंबले आहे.
भुयारी विद्युत केबल टाकल्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यातील अडचणी कमी होणार आहेत. शिवाय देखभाल खर्चही कमी होणार आहे. शासनाकडून निधी मंजूर आहे. परंतु, केवळ ठेकेदाराकडून विलंब झाल्यामुळेच काम थांबले होते. ठेकेदाराला समज देऊन डिसेंबर २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अजितकुमार कागी, कार्यकारी अभियंता, महावितरण.
गतिमान विद्युत विकास कार्यक्रमातून होणारी कामे
शिंदेमळा येथे ३३ बाय ११ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र
रिसाला रोड येथे दहा एमव्हीए क्षमतेचे निवीन रोहित्र बसविणे
महापालिका क्षेत्रात नवीन ९५ रोहित्र बसविणे
४जिल्ह्यातील १४० वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे