कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील गट नं. ३७७९/अ व लष्करी तळ परिसरातील अतिक्रमणे अथवा अनधिकृत बांधकामे फार जुनी असली व त्या बांधकामांवर मोठा खर्च केला असला तरी, ग्रामपंचायत प्रशासनाने ती तात्काळ काढावीत, असे आदेश तहसीलदार सौ. रुपाली सरनोबत यांनी ग्रामपंचायत प्रशासनास दिले. त्यामुळे मोठी अतिक्रमणे निघणार की नाही, याबद्दल असणारी साशंकता दूर झाली आहे.कामेरी ग्रामपंचायतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात शिवपुरी रस्त्यालगतची कच्ची व पक्की घरे असलेली अतिक्रमणे काढली आहेत. अतिक्रमणे हटविताना विरोध केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. काही ग्रामस्थांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. मात्र प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असणारी अतिक्रमणे फार जुनी व त्यावर आर. सी.सी. पक्की घरे बांधली गेलेली आहेत. ती काढण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते.त्यानुसार तहसीलदार सौ. रुपाली सरनोबत यांनी लेखी आदेशाने ३७७९/अ व इस्लामपूर-कामेरी रस्त्यालगत लष्करी तळावरील अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे आदेश दिले आहेत. ही अतिक्रमणे खूप कालावधीपासूनची असली किंवा त्यावरील बांधकामांवर प्रचंड खर्च करण्यात आला असला तरीही त्यांना संरक्षण अथवा अतिक्रमण नियमित करु नये. ही जमीन व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने अतिक्रमणे करणाऱ्या लोकांवर तात्काळ पोलिसांत फिर्याद द्यावी व अतिक्रमणे दूर करुन कार्यवाही केल्याचा अहवाल पाठवावा, असा आदेश दिला आहे.दरम्यान, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाने अतिक्रमण असणाऱ्या लोकांना ती काढून घेण्याबाबत नोटीस दिली आहे. तसेच त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अशी विनंती केली आहे. त्यानुसार कर्मवीर शिक्षण संस्थेने आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांचे अनुकरण इतरांनी करावे, असे आवाहन ग्रामसेवक बादशहा नदाफ यांनी केले आहे. (वार्ताहर)जुनी अतिक्रमणे तातडीने हटविणारकामेरीतील प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असणारी अतिक्रमणे फार जुनी असून त्यावर आर.सी.सी. पक्की घरे बांधली गेलेली आहेत. ती काढण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार तहसीलदार सौ. रुपाली सरनोबत यांनी लेखी आदेशाने ३७७९/अ व इस्लामपूर-कामेरी रस्त्यालगत लष्करी तळावरील अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे आदेश दिले आहेत. ३७७९/अ मध्ये प्राथमिक शाळा- ८0 गुंठे, कर्मवीर संस्था ४१ गुंठे, हिंदू स्मशानभूमी ५ गुंठे, लिंगायत समाज स्मशानभूमी ५ गुंठे यांना शासनाने जमीन दिली आहे. तसेच बाजारकट्टे व जनावरांच्या दवाखान्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याने उर्वरित सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाने अतिक्रमण असणाऱ्या लोकांना ती काढून घेण्याबाबत नोटीस दिली आहे. तसेच त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अशी विनंती केली आहे.
कामेरीमधील सर्व अतिक्रमणे हटवा...
By admin | Updated: January 30, 2015 23:14 IST