सांगली जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट

By Admin | Updated: December 1, 2014 00:14 IST2014-11-30T22:21:18+5:302014-12-01T00:14:05+5:30

प्रभावी जनजागृती : तपासणी केलेल्या व्यक्तींमधील बाधित व्यक्तींचे प्रमाण २.४८ टक्क्यांवर, आठ वर्षात झाली संख्या कमी

Decrease in the extent of HIV / AIDS in Sangli district | सांगली जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट

सांगली जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांच्या प्रमाणात घट

नरेंद्र रानडे - सांगली -कधी काळी एचआयव्हीमध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात प्रभावी जनजागृतीचे परिणाम दिसू लागले आहेत. २००६ मध्ये सांगली जिल्ह्यात तपासणी केलेल्या व्यक्तींपैकी एचआयव्ही बाधितांचे प्रमाण ३४.७४ टक्के होते. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जागृती केल्यामुळेच यंदा आॅक्टोबर २०१४ अखेर या प्रमाणात तब्बल ३२.२६ टक्क्यांनी घट होऊन आॅक्टोबर २०१४ अखेर ते २.४८ टक्के इतके झाले आहे.

एड्सविषयी लोकांच्या मनात असलेली भीती नाहीशी व्हावी आणि अधिकाधिक जणांनी विनासंकोच एचआयव्हीची चाचणी करावी, यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ‘शून्य गाठणे’ (गेटिंग टू झिरो) ही एड्स दिनाची संकल्पना आहे. एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण शून्यावर आणणे, हा संकल्पनेमागील उद्देश आहे. एड्स समाजातून हद्दपार व्हावा यासाठी शासनाप्रमाणेच स्वयंसेवी संस्थांचे देखील मोठे योगदान आहे. प्रामुख्याने स्वयंसेवी संस्था या महाविद्यालयीन परिसर, वेश्या वस्ती, ट्रकचालक, परराज्यातून येणारे कामगार यांच्यामध्ये जागृती करीत आहेत. यामध्ये सातत्य असल्याने एचआयव्हीची तपासणी करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ज्यांचा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे, त्यांना शासनाच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधे देण्यात येत आहेत.
जागृतीच्या माध्यमातून एचआयव्ही म्हणजे आजार नसल्याचेही नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात येत आहे.




एचआयव्हीबाधितांनी नियमित औषधे घेणे आवश्यक आहे. मोफत उपचार असूनही काहीजण नियमित औषधे घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता मागील महिन्यापासून आम्ही एचआयव्ही बाधितांच्या घरी जाऊन त्यांना निरोगी आयुष्यासाठी पूर्ववत औषधे सुरू करण्याची विनंती करीत आहोत.
- विवेक सावंत, कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष.



आई एचआयव्ही बाधित असल्यास नवजात बालकाला एचआयव्हीची लागण होऊ नये, याची दक्षता घेण्यात येते. याकरिता प्रसुतीच्या दुसऱ्या टप्प्यात आईला टीएलसी टॅब्लेट दिल्या जातात, तर बालकाला नेव्हीसिरपचा डोस दिला जातो. यामुळे बालकाला एचआयव्हीची लागण होऊ शकत नाही.
- प्रमोद संकपाळ, पर्यवेक्षक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष.


एचआयव्ही हद्दपार होत आहे...
वर्षतपासणी बाधितटक्केवारी
२००६६४९९२२५८ ३४.७४
२००९२९२५७३१८६ १०.८९
२०१२४१९२२२२११ ५.२७
२०१४५३३६६१३२६ २.४८
(आॅक्टोबर अखेर)



गरोदर मातांमधील प्रमाणातही घट
वर्षतपासणी बाधित टक्केवारी
२००६७८३५१८४ २.३५
२००९१९०४२१५१ ०.७९
२०१२३५४०४७५ ०.२१
२०१४४४२७९५२ ०.१२
(आॅक्टोबर अखेर)

Web Title: Decrease in the extent of HIV / AIDS in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.