महापालिका क्षेत्रात रस्ते अपघातात १,९८४ प्राण्यांचा बळी
By Admin | Updated: April 13, 2015 00:08 IST2015-04-12T23:46:24+5:302015-04-13T00:08:33+5:30
धक्कादायक वास्तव : बिगरसरकारी संस्थांच्या सर्वेक्षणातील आकडेवारी; सामूहिक खबरदारीतूनच वाचू शकतात मुके जीव

महापालिका क्षेत्रात रस्ते अपघातात १,९८४ प्राण्यांचा बळी
नरेंद्र रानडे - सांगली मागील वर्षी महापालिका क्षेत्रात तब्बल १,९८४ मुक्या प्राण्यांचा रस्ता अपघातात बळी गेला आहे, तर तीनशेहून अधिक प्राणी जखमी झाले आहेत. अर्थात ही आकडेवारी केवळ नोंदविण्यात आलेली आहे. माणसांचे बळी गेल्यावर खडबडून जागी होणारी प्रशासकीय यंत्रणा, निष्पाप प्राण्यांचे एवढे बळी जाऊन मात्र उदासीन आहे.
आधुनिक युगात शहरीकरण अपरिहार्य आहे. परंतु त्याचवेळी त्याच शहरात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांचा जीव देखील मोलाचा आहे, याचा विसर नागरिकांनी पडू देता कामा नये. हमरस्ता परिसरात उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या प्राण्यांचा बळी हा ठरलेला आहे. महापालिका क्षेत्रातील उपनगरांमध्येही वेगाने वाढ होत आहे. तेथे जाण्यासाठी निर्माण होणाऱ्या रस्त्यावर प्रामुख्याने रात्रीच्यावेळी भरधाव वाहनांखाली येऊन मांजर, कुत्री, मुंगूस, बेडूक, इजाट, साप आदी प्राण्यांचा हकनाक बळी जात आहे. शहरातील तीन बिगरसरकारी संस्थांनी महापालिका क्षेत्रात अपघातात प्राणास मुकलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यात पुढाकार घेतला असून, त्यामधून ही आकडेवारी समोर आली आहे. शहरवासीयांना ती विचार करावयास लावणारी आहे.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचे कार्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत आरोग्य विभागाकडून करण्यात येते. अद्यापपर्यंत प्राण्यांचे बळी जाऊ नयेत यासाठी जनजागृतीची कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही.
- के. जी. गोंधळेकर, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, महापालिका सांगली.
रस्ते अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी ‘अॅनिमल केअर युनिट’ नावाने रुग्णवाहिका सेवा दोन वर्षांपासून सुरू केली आहे. याच्या माध्यमातून अनेक प्राण्यांचे जीव वाचविण्यात आलेले आहेत.
- मुस्तफा मुजावर, अध्यक्ष, इन्साफ फौंडेशन, सांगली
प्रामुख्याने हमरस्त्यावर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या प्राण्यांचे बळी मोठ्या प्रमाणात जातात. वन्यप्राण्यांच्या काही जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे वाहनधारकांनी अतिवेगाने वाहने चालवून स्वत:चा व प्राण्यांचाही जीव धोक्यात घालू नये.
- प्रदीप सुतार, वन्यजीवप्रेमी
महापालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत नसल्याने प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांच्या पिलांची संख्या वाढते. दुर्दैवाने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाखाली येऊन या पिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे मनपाने तातडीने कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजे.
- अशोक लकडे, जिल्हाध्यक्ष, पीपल्स फॉर अॅनिमल.
बळी जाऊ नयेत म्हणून...
महापालिका क्षेत्रात वाहनांचा वेग कमी ठेवावा .
रस्त्यावर ठराविक अंतरावर प्राणीमित्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर फलकावर नमूद असावा.
अपघातात प्राणी जखमी झाल्यास त्याला तातडीने उपचारासाठी वाहनचालकांनी पुढाकार घ्यावा.
प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावावी, यासाठी पीपल्स फॉर अॅनिमल संघटनेचे अशोक लकडे यांनी सांगली-मिरज रस्त्यावर पार्श्वनाथनगरमध्ये दहा गुंठे जागेत स्मशानभूमी उभारली आहे.
महापालिका अॅक्टनुसार मोकाट प्राण्यांना रस्त्यावर फिरु न देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येते. परिणामी प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
प्राणी संख्या
कुत्री४३३
मांजर१५२१
खोकड२
मुंगूस२
इजाट७
पाणकोंबडी ९
भारद्वाज ६
निळी पाणकोंबडी १
गाढव २