स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू
By Admin | Updated: September 22, 2014 00:59 IST2014-09-22T00:59:28+5:302014-09-22T00:59:42+5:30
मृत कवठेएकंदचा : भीतीचे वातावरण

स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा मृत्यू
सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता. या रुग्णाला सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. तपासणीसाठी त्याचा अहवाल पुणे येथील एन. आय. व्ही. या संस्थेकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कवठेएकंदमध्ये ‘त्या’ रुग्णाच्या घराशेजारील कुटुंबाची तपासणी केली असून, औषधोपचारही केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी दिली.
कवठेएकंद येथील एकास संशयास्पद स्वाइन फ्लूचा रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार झाल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होती. परंतु, अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्याचा रविवार, दि. २१ रोजी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने कवठेएकंद परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु, जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधासाठी ‘टॉमी फ्लू’च्या गोळ्या जिल्ह्यातील २६ औषध विक्री दुकानात मिळण्याची व्यवस्था केली आहे. स्वाइन फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या गावात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, त्या कवठेएकंद आणि मणेराजुरी या दोन गावांचे जलद सर्वेक्षण झाले आहे. संबंधित ग्रामीण रुग्णालयांना औषध पुरवठा करण्यात आला आहे. भीतीचे कारण नसून, स्वच्छता राखावी, हस्तांदोलन टाळावे, बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)