Sangli: त्रिमूर्तीमधील शेवटची कडी निखळली, कष्टकऱ्यांच्या चळवळीचा त्रिवेणी संगम आटला
By अविनाश कोळी | Updated: December 29, 2023 14:28 IST2023-12-29T14:28:37+5:302023-12-29T14:28:47+5:30
गल्लीपासून विधानसभेपर्यंत शरद पाटील, संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की यांचा होता दबदबा

Sangli: त्रिमूर्तीमधील शेवटची कडी निखळली, कष्टकऱ्यांच्या चळवळीचा त्रिवेणी संगम आटला
अविनाश कोळी
सांगली : मैत्री व रक्ताच्या नात्यापेक्षा राजकारणाला महत्त्व देणाऱ्यांच्या काळात सांगलीतील तीन नेत्यांनी राजकारणात असूनही मैत्रीला उच्च स्थान दिले. पैसा, प्रतिष्ठा आणि राजकारणापेक्षा तत्त्वनिष्ठा, चळवळ जपत आयुष्यभर व्रतस्थ राहिले. सांगलीतील या तीन माजी आमदारांची वाटचाल म्हणूनच राजकारणातील आदर्श मानली जाते. अशा समृद्ध राजकीय परंपरेतील शेवटची कडी प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.
राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरही दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा दबदबा होता. या काळातच ॲड. व्यंकाप्पा पत्की, बिजलीमल्ल संभाजी पवार व प्रा. शरद पाटील या त्रिमूर्तींचा उदय झाला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याकडे बघण्याचीही हिंमत ज्या काळात कोणाचीही होत नव्हती, त्या काळात या तिन्ही नेत्यांनी प्रस्थापितांना हादरे देऊन राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा डंका वाजवला. जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्थापितांना हादरे दिले.
तिन्ही नेत्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली. पत्की हे विधान परिषदेवर तर संभाजी पवार व शरद पाटील यांनी जनतेतून निवडून येत विधानसभा गाठली. विधानसभेत कष्टकरी, वंचितांचे प्रश्न मांडून तिघांनीही राज्यात दबदबा निर्माण केला. जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपद सांगलीच्या दोन्ही नेत्यांनी भूषविले. भाजपामध्ये गेल्यानंतर संभाजी पवारांना प्रदेश उपाध्यक्षपदही मिळाले.
राजकारणात जपली मैत्री
संभाजी पवारांना ताकद देऊन त्यांना आमदार करण्यात व्यंकाप्पा पत्कींची मैत्री कारणीभूत ठरली. त्यानंतर याच मैत्रीचा धागा जपत व्यंकाप्पा पत्कींना विधान परिषदेवर घेण्यासाठी संभाजी पवार यांनी ताकद लावली. राजकारणातल्या सच्च्या मैत्रीचा अध्याय या तिघा नेत्यांनी लिहिला. या मैत्रीतली पहिली कडी व्यंकाप्पा पत्कींच्या माध्यमातून २०१४ मध्ये निखळली. त्यानंतर २०२१ मध्ये संभाजी पवार यांचे निधन झाले. या परंपरेची तिसरी कडी नुकतीच प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.
प्रस्थापितांना हादरे देणारे राजकारण..
- १९८५ पासून १९९९ पर्यंत या त्रिमूर्तींचा सांगली, मिरजेच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला. वसंतदादांच्या हयातीत त्यांचे पुतणे विष्णुआण्णा पाटील यांना पराभूत करुन संभाजी पवार आमदार झाले.
- दादांच्या पश्चात शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की आमदार झाले. शेरीनाला, गुंठेवारी अशा ज्वलंत प्रश्नांसह हातगाडी विक्रेते, हमाल व अन्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी रान पेटविले होते.
- प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देत त्यांच्या राजकारणाची वाटचाल सुरू झाली. पक्ष बदलले तरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ते लढतच राहिले.