पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ :

By Admin | Updated: November 21, 2014 00:29 IST2014-11-20T22:36:59+5:302014-11-21T00:29:24+5:30

पुन्हा निविदा दाखल झाली नाही तर शासनाकडे अहवाल जाणार

Deadline till December 5: | पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ :

पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ :

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास दोनवेळा मुदतवाढ देऊनही, नव्याने एकही निविदा दाखल झालेली नाही. आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, ही मुदतवाढ अंतिम आहे. यावेळीही प्रतिसाद न मिळाल्यास, लिलावास प्रतिसाद नसल्याचा अहवाल शासनाकडे देणार असल्याचे, जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले.
वसंतदादा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची २१ कोटींची देणी अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. शेतकरी, जिल्हा बँक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकीसह जवळपास शंभर कोटींची थकबाकी कारखान्याकडे आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला शासनानेही परवानगी दिली.
जागा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चारजणांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे असून, समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक सह. संस्था साखर योगीराज सुर्वे यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीने जागा विक्री निविदेस पुन्हा ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, या कालावधित निविदा दाखल न झाल्यास राज्य शासनास तसा अहवाल देणार आहे. यावर शासनच योग्य तो निर्णय घेईल, असे मत शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

समितीसमोर पेचप्रसंग
कारखान्याने २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडले. त्याच्या रेखांकनाला महापालिकेची मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानंतर समितीने जागा विक्रीची निविदा प्रसिद्ध करीत १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधित केवळ तीन प्लॉटसाठी तीन निविदा दाखल झाल्या.
निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने समितीने प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीत नव्याने एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा २० नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती.
दुसऱ्या मुदतीत एकही निविदा दाखल झाली नसल्यामुळे जागा विक्री समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.

Web Title: Deadline till December 5:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.