ऐतवडे खुर्दमध्ये ऊसतोड मजुराच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:49 IST2021-12-08T18:48:34+5:302021-12-08T18:49:05+5:30
खेळता खेळता ती शेतातील विहिरीकडे गेली. यावेळी तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. यात तिचा बुडून मृत्यू झाला.

ऐतवडे खुर्दमध्ये ऊसतोड मजुराच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू
कुरळप : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील ऊसतोड मजुराची लहान मुलगी पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून तिचा मृत्यू झाला. वैशाली कोंडिबा शिंदे (वय ६) असे तिचे नाव आहे. कुरळप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
ऐतवडे खुर्द परिसरात पिंपरी (ता. माळशिरस जि. सोलापुर) येथील ऊसतोड मजुरांची टोळी आली आहे. या टोळीत कोंडिबा रामचंद्र शिंदे हे पत्नी शांताबाई, मुलगी वैशाली व दोन वर्षांच्या मुलासह आले आहेत. मंगळवारी सकाळी सर्व मजूर ऊसतोडीसाठी गेले होते.
यावेळी कोंडिबा यांच्या पत्नी शांताबाई लहान मुलगा व वैशालीसह झोपडीतच थांबल्या होत्या. रात्री आठच्या सुमारास त्या झोपडीत होत्या; तर वैशाली झोपडीबाहेर खेळत होती. खेळता खेळता ती हातात लहान कळशी घेऊन रामचंद्र चौगुले यांच्या शेतातील विहिरीकडे गेली. यावेळी तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. यात तिचा बुडून मृत्यू झाला.