मालगावात जमीन हडपण्याचा ‘दास’चा प्रयत्न हाणून पाडला
By Admin | Updated: July 7, 2016 00:28 IST2016-07-06T23:50:00+5:302016-07-07T00:28:12+5:30
ग्रामपंचायतीची कारवाई : ताबा घेऊन जागेत वृक्षारोपण

मालगावात जमीन हडपण्याचा ‘दास’चा प्रयत्न हाणून पाडला
मालगाव : आ. सुरेश खाडे यांचा विरोध झुगारून बुधवारी मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या गायरान जमिनीचा मालगाव ग्रामपंचायतीने ताबा घेतला. ताबा घेतलेल्या जमिनीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. ग्रामपंचायतीच्या पवित्र्यामुळे जमीन कब्जात घेण्याचा आ. खाडे यांचा प्रयत्न असफल ठरला आहे.
मिरज-पंढरपूर मार्गालगत मालगाव हद्दीतील गट नं. २२४३ व २२४७ मध्ये सुमारे ९ एकर गायरान जमीन आहे. राज्यमार्गालगत असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या या जमिनीवर अनेकांचा डोळा होता. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी केलेल्या ठरावामुळे आ. खाडे यांच्या दास बहुउद्देशीय संस्थेला गट नं. २२४३ मधील १ हेक्टर ९० आरपैकी १ हेक्टर ३१ व गट नं. २२४७ मधील १ हेक्टर ६२ आरपैकी ८० आर अशी एकूण पाच ५ एकर ११ गुंठे ही कोट्यवधी रुपयांची जमीन देण्यात आली आहे. शासन स्तरावर या जमिनीचे दास संस्थेकडे हस्तांतरण झाल्याने मोठा वादंगही झाला होता.
मात्र आ. खाडे यांच्या दास बहुउद्देशीय संस्थेने ५ एकर ११ गुंठ्यावर ताबा घेऊन शिक्षण संस्थेसाठी इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र त्यांनी गायरानच्या सर्व क्षेत्राला कुंपण घातल्याने भविष्यात आ. खाडे यांच्याकडून शिल्लक जमीनही हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. उर्वरित खाडे यांच्या संस्थेने कुंपण घातलेली साडेतीन एकर जमीन ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्याच्या मागणीचा ग्रामसभेत ठरावही केला आहे.
बुधवारी ग्रामपंचायतीने आ. खाडे यांचा विरोध झुगारून रस्त्याकडेला असलेल्या साडेतीन एकर जमिनीचा ताबा घेतला. ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गटाचे नेते व जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, सरपंच प्रशांत माळी, गटनेते प्रदीप सावंत यांच्यासह सदस्यांनी या जमिनीवर वृक्षारोपण केले. ग्रामपंचायतीच्या जमिनीत वृक्ष लागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे. (वार्ताहर)
घरकुल योजना राबविणार : सरपंच, उपसरपंच
मालगावचा विस्तार वाढत आहे. अनेक गरीब कुटुंबांना जागेअभावी घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या तीन एकर जमिनीवर सध्या वृक्ष लागवड सुरू आहे. भविष्यात या जागेवर भक्तनिवास व घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी या जागेचा वापर करावा, अशी सदस्यांची मागणी असल्याचे सरपंच प्रशांत माळी व उपसरपंच राजू भानुसे यांनी सांगितले.