कडेपूरमध्ये डोंगराईदेवी डोंगराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:25 IST2019-04-03T16:24:42+5:302019-04-03T16:25:33+5:30
येथे डोंगराईदेवी डोंगराला मंगळवारी सायंकाळी नेर्ली गावाच्या बाजूने भीषण आग लागली. काही वेळातच तडसर, कडेगाव व कडेपूरच्या बाजूने आग पसरल्याने परिसरातील झाडे-झुडपे, वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे

कडेपूरमध्ये डोंगराईदेवी डोंगराला भीषण आग
कडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव) येथे डोंगराईदेवी डोंगराला मंगळवारी सायंकाळी नेर्ली गावाच्या बाजूने भीषण आग लागली. काही वेळातच तडसर, कडेगाव व कडेपूरच्या बाजूने आग पसरल्याने परिसरातील झाडे-झुडपे, वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले नव्हते. डोंगराईदेवी मंदिर व परिसर मात्र आगीपासून सुरक्षित आहे.
कडेपूर येथील डोंगराईदेवी मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. डोंगरमाथ्यावर असलेले डोंगराईदेवी मंदिर व परिसरात पर्यटन विकासमधून मोठ्या प्रमाणात वनराई फुलविण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी लागलेल्या या आगीत डोंगराई मंदिर परिसर वगळता आजुबाजूची झाडे-झुडपे जळून खाक झाली. डोंगराईदेवी डोंगराला नेर्लीच्या बाजूने आग लागल्याचे समजताच वन विभागाचे वनरक्षक व वनमजूर आग आटोक्यात आणण्यासाठी धावाधाव करीत होते. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य बनले. काही वेळातच आग चोहोबाजूने पसरू लागली. जवळपास २०० हेक्टर डोंगर, तसेच वन्यजीव व वन्यप्राण्यांचा चारा, झाडे-झुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.