सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रक्ताचा दुष्काळ...

By Admin | Updated: June 14, 2016 00:03 IST2016-06-13T23:56:18+5:302016-06-14T00:03:50+5:30

रक्तदान लोकचळवळ होण्याची गरज : संकुचित मानसिकताही रक्ताच्या तुटवड्यास कारणीभूत असल्याचे चित्र

Dangerous of blood in district including Sangli, Mirage ... | सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रक्ताचा दुष्काळ...

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात रक्ताचा दुष्काळ...

शरद जाधव--- सांगली --आजच्या आधुनिक जीवनात मी आणि माझे कुटुंब यात आपले गुरफटलेपण वाढत असतानाच, ‘दान’ ही संकल्पना हद्दपार होत चालली आहे. तसेच रक्तदान करणे शरीरास लाभदायक आहे का? यासह अनेक भ्रामक कल्पनांमुळे, सध्या रक्ताची गरज असतानाही, जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चिंताजनक चित्र आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सलग दुष्काळाचा सामना करावा लागत असताना, आता संकुचित मानसिकतेमुळे रक्ताचाही दुष्काळ असल्याचे म्हणावे लागत आहे.


आजच्या आधुनिक युगात देहदान, नेत्रदान आणि रक्तदान यांना महत्त्व आले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या जागृतीमुळे या तीनही प्रकारात नागरिकांचा सहभाग वाढत आहे. पण रक्तदानाबाबत असलेले गैरसमज रूग्णांना अडचणीचे ठरत आहेत. रक्तदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचे प्राण तर वाचतातच, परंतु तीन महिन्यांनी एकदा रक्तदान केल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदतच होते. किडनी आणि हृदयविकाराचे आजार देखील कमी होण्यास मदत होते, असे विज्ञान सांगत असले तरी, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
जिल्ह्यातील रक्ताच्या तुटवड्याचा आढावा घेतला असताना, सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ‘ए’, ‘बी’ पॉझीटिव्ह आणि निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच शेजारच्या कर्नाटकातूनही रक्ताची मागणी असल्याने शहरातील रक्तपेढ्यांवर ताण पडत आहे.
सांगली, मिरजेत एकूण ११ रक्तपेढ्या आहेत. यात शासकीय रूग्णालय, वसंतदादा, शिरगावकर व सिध्दिविनायक या जुन्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. गोरगरीब रूग्णांना खासगी रूग्णालयातील उपचार परवडत नसल्याने, ते शासकीय रूग्णालयाचा आधार घेतात. याठिकाणी केवळ ‘व्होल ह्युमन’ हे कोणतेही प्रक्रिया न केलेले रक्त उपलब्ध होते. अपघात व अन्य कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी त्यावेळी रुग्णालयाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करू शकत नाही. त्यासाठी आपले सामाजिक भान जपत रक्तदान चळवळ वाढविणे ही गरज बनली आहे.

सध्याची रक्ताची उपलब्धता लक्षात घेतली, तर ती मागणीपेक्षा खूपच कमी आहे. ज्या रूग्णाला रक्ताची गरज आहे, त्याच्या नातेवाईकांनाच त्यासाठी धावपळ करावी लागते. सध्या रक्तदान शिबिरांचेही प्रमाण कमी झाले आहे, हे दुर्दैवी असून केवळ सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनीच नव्हे, तर सर्वांनीच यासाठी पुढाकार घेत रक्तदान चळवळ वाढविली पाहिजे. रक्तदानाचा एक निर्णय रुग्णाचे प्राण वाचवू शकतो, याचे भान प्रत्येक असायला हवे.
-धनंजय भिसे, जनसंपर्क अधिकारी, भारती हॉस्पिटल रक्तपेढी, सांगली.

Web Title: Dangerous of blood in district including Sangli, Mirage ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.