‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

By Admin | Updated: August 14, 2015 00:01 IST2015-08-13T23:24:31+5:302015-08-14T00:01:55+5:30

शेतकरी संकटात : सोनी परिसरात खरीप पिके वाळली, विहीर व कूपनलिकाही कोरड्या

'Dangarwadi' water becomes a mirage! | ‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

संजय जाधव - सोनीसह परिसरातील पिके पाण्यावाचून करपली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सलग चौथ्यावर्षी खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. म्हैसाळ कालव्याचे पाणी सुरू असते तर, ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी चर्चा शेतकरी वर्गातून चालू आहे. पाण्याअभावी पिके वाळली असल्याने डोंगरवाडी योजनेचे पाणी हे मृगजळच ठरले आहे.
सोनीसह परिसरातील जवळपास २२ गावांना म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजना तयार पूर्ण करावी, यासाठी सतत आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला अखेर यशही आले. या योजनेतून पाणीही सोडण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरीवर्ग आनंदित झाला होता; पण या आनंदावर लगेच विरजण पडले. विजेच्या थकबाकीपोटी म्हैसाळ कालवा बंद पडल्याने डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे कठीण झाले.
पाण्याच्या आशेवर मान्सूनचा थोडाफार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज आहे; पण पाऊसच नसल्याने विहीर व कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे पाणी नाही. पाण्याअभावी पिके करपली असून, सलग चौथ्यावर्षी खरीप वाया जाण्याची भीती असून, खरिपाचे पीक नसल्याने गरीब शेतकरी हवालदिल झाला आहे.
म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडले असते, तर अशी परिस्थिती झाली नसती. सोनीसह परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे.
पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप लांबून पाईपलाईन करून स्वखर्चाने पाणी आणले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची गरज येथील शेतकरी चांगला जाणतो आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका या शेतकऱ्यालाही बसला आहे. त्यातच या पावसाने दडी मारल्याने पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी दाखवलेली निराशा व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच असून, पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी खात्याकडून कठोर निर्णयाची गरज आहे.

पाटबंधारे खात्याचा भोंगळ कारभार
सोनी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सतीश जाधव यांनी सांगितले की, पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी केलेली टाळाटाळ व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच आहे. सोनी परिसरातील पिके पाण्याअभावी करपली असून, डोंगरवाडी योजनेचे पाणी मिळाले असते तरी, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. पावसाने अशीच दडी मारली तर, द्राक्षबागेच्या छाटणीसाठीही पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: 'Dangarwadi' water becomes a mirage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.