द्राक्ष, डाळिंबाचे ३९ कोटींचे नुकसान
By Admin | Updated: November 17, 2014 23:22 IST2014-11-17T23:09:37+5:302014-11-17T23:22:16+5:30
जिल्ह्यातील स्थिती : कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; ३७९९ हेक्टर पिकांची अवकाळीने हानी

द्राक्ष, डाळिंबाचे ३९ कोटींचे नुकसान
सांगली : जिल्ह्यात आठ दिवस ढगाळ वातावरण असल्याने आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे ३७९९ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. या पिकांचे एकरी ५० हजार नुकसान धरल्यास सुमारे ३९ कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ढगाळ हवा आणि पावसामुळे रोग पसरू नयेत म्हणून गेल्या आठ दिवसात सुरू असलेल्या औषध फवारणीचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने पॅकेजच्या माध्यमातून हातभार लावण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
मागील आठवड्यात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पाऊस आणि ढगाळ वातावरणाने जिल्ह्यातील द्राक्षबागांवर संकटाचे ढग दाटले आहेत. निसर्गाच्या या माऱ्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तासगाव, पलूस, मिरज, खानापूर, वाळवा, शिराळा, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांत नुकसानीची टांगती तलवार लटकत आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) आहेत, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा फैलाव होऊ नये म्हणून औषध फवारणीही सुरू आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष, डाळिंब बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने बागांची पाहणी केली आहे. याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे म्हणाले की, आम्ही सर्व द्राक्ष, डाळिंब बागांची जागेवर जाऊन पाहणी केली आहे. जिल्ह्यातील दहा हेक्टर केळी, २६६९ हेक्टर द्राक्ष आणि १११५ हेक्टर डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. या सर्व बागांचे ५० टक्क्यपेक्षा कमी नुकसान झाले असले तरीही उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.
कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, खानापूर, जत तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांचे सर्वधिक नुकसान झाले आहे. एकरी ५० हजार नुकसान धरल्यास २६६९ हेक्टरवरील द्राक्षबागांना ३३ कोटी ३६ लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील एक हजार ११५ हेक्टर डाळिंब बागांचेही नुकसान झाले आहे. एकरी ५० हजार नुकसान धरल्यास ५.६५ कोटीचे नुकसान होणार आहे. शासकीय आकडेवारीनुसार सर्व नुकसानीचा आकडा ३९ कोटीपर्यंत पोहोचत आहे.
दावण्या आणि द्राक्षाच्या घडात पाणी साचून राहिल्यामुळे निर्माण झालेल्या फळकुजव्या रोगामुळे मोठे नुकसान होणार आहे. दुसऱ्या बाजूला रोग येऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात एक लाखाहून अधिक द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. त्यापैकी ४०,००० एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. १० ते २५ आॅक्टोबरदरम्यान छाटण्या झालेल्या द्राक्षबागांचे ६० टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदार संघातर्फे औषध फवारणीसंबंधी मार्गदर्शन केले आहे.
-सुभाष आर्वे, द्राक्ष बागायतदार
पिकांचे नुकसान (आकडे हेक्टरमध्ये)
तालुकाद्राक्षडाळिंब
क.महांकाळ५५०४६०
खानापूर१८०५
आटपाडी३१२००
तासगाव६००—
पलूस३१८—
जत४४०४५०
मिरज५५०—
एकूण२६६९१११५