दलितवस्तीच्या कामांसाठी दलित अभियंते, मजूर साेसायट्या आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:21+5:302021-09-22T04:29:21+5:30
मालगाव : मिरज तालुक्यात दलितवस्तीच्या कामांचा ठेका देताना मागासवर्गीय ठेकेदार अभियंते व मजूर सोसायट्यांना डावलून शासन आदेशाचा भंग झाल्यास ...

दलितवस्तीच्या कामांसाठी दलित अभियंते, मजूर साेसायट्या आक्रमक
मालगाव : मिरज तालुक्यात दलितवस्तीच्या कामांचा ठेका देताना मागासवर्गीय ठेकेदार अभियंते व मजूर सोसायट्यांना डावलून शासन आदेशाचा भंग झाल्यास ग्रामसेवक अडचणीत येणार आहेत. याबाबत मिरज पंचायत समितीचे सदस्य किरण बंडगर यांनी शासन आदेशानुसारच दलितवस्ती कामांचे वाटप करावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शासन परिशिष्ट ‘अ’ मधील क्र. १२च्या मुद्द्यानुसार दलितवस्तीच्या कामांसाठी ग्रामपंचायतीकडून अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकांतील सुशिक्षित बेराेजगार अभियंते तसेच मजूर सोसायट्यांची निवड करावी, अशा स्पष्ट सूचना आहेत. यापूर्वी मागासवर्गीय अभियंत्यांची व मजूर सोसायट्यांची संख्या मर्यादित असल्याने शासन निर्णय बाजूला ठेवून ही कामे इतर अभियंते व मजूर सोसायट्यांना ग्रामपंचायत स्तरावर दिली जात होती. सध्या जिल्ह्यात दलित समाजातील अभियंत्याची व मजूर सोसायट्यांची संख्या वाढल्याने ही कामे मिळविण्यासाठी ते आक्रमक झाले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने दलितवस्तीची कामे शासन निकषानुसार दलित अभियंते व सोसायट्यांनाच वाटप करण्याची सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर मात्र अंमलबजावणी होत नसल्याची मिरज पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांची तक्रार आहे. यापुढे दलित वस्तीची कामे दलित अभियंते व मजूर सोसायट्यांनाच मिळावीत अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बंडगर यांनी दिला आहे.
चौकट
ठरावाने ग्रामसेवक येणार अडचणीत
कामांच्या वाटपात दलित अभियंत्यांना व मजूर सोसायट्यांना डावलल्यास ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा ठराव किरण बंडगर यांनी पंचायत समिती सभेत करून घेतल्याने शासन आदेश डावलून कामे वाटप केल्यास ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.