सांगली : प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर-हुबळी एक्स्प्रेस (क्र. १७३१८) चा किर्लोस्करवाडीचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गुरुवारपासून या थांब्याचे नाव रिझर्व्हेशन पोर्टलवर दिसू लागल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळाला.मोठ्या संघर्षानंतर किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर हुबळी-दादर एक्स्प्रेस व दादर-हुबळी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबा जुलै २०२४ पासून ६ महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर मंजूर करण्यात आला होत्या. या दोन्ही गाड्यांना किर्लोस्करवाडी स्थानकावरून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हुबळी-दादर गाडी जानेवारीपासून कायम करण्यात आली होती. पण दादर-हुबळी या परत येणाऱ्या गाडीची तिकीट विक्री बंद असल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.
किर्लोस्करवाडी येथील मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे चंद्रकांत जाधव, डॉ. चंद्रशेखर माने, राजाभाऊ माने, अजित लिंगरेकर, जीवन आप्पा नार्वेकर, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे उमेश शाह तसेच डिव्हिजनल रेल्वे विभागीय समितीचे सदस्य गोपाळ तिवारी, सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप धाईंजे यांनी याप्रश्नी आवाज उठविला. परतीच्या गाडीला किर्लोस्करवाडीचा थांबा न दिल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर या गाडीला किर्लोस्करवाडीचा थांबा मंजूर झाला तसेच आयआरसीटीसी संकेतस्थळावर रिझर्व्हेशनही सुरू झाले.
२६ जानेवारीपर्यंत वेटिंगदादर ते किर्लोस्करवाडी या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर स्लीपर कोचची १६ फेब्रुवारीपर्यंतची तिकिटे बुक झाली असून वेटिंग व आरएसीचा आकडा वाढत आहे. एसी थ्री व टू टियरचेही बुकिंग फुल्ल दिसत आहे.
तत्काळ तिकिटाचा पर्यायहुबळी-दादर व दादर-हुबळी एक्स्प्रेस या गाड्यांची तत्काळ तिकीट विक्रीही किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन वरून सुरू आहे. तत्काळ तिकीट विक्री प्रवासाच्या एक दिवस अगोदर सुरू होते. प्रवाशांना आता तत्काळ तिकिटाचा पर्यायही आहे.
कर्नाटकातील प्रवाशांचीही सोयकर्नाटकाच्या हुबळी, धारवाड, बेळगाव, घटप्रभा, लोंढा परिसरातून किर्लोस्करवाडीला येण्यासाठीसुद्धा ही गाडी अत्यंत उपयुक्त असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
किर्लोस्करवाडीच्या तसेच याठिकाणी नियमित येणाऱ्या प्रवाशांना या परतीच्या गाडीने दिलासा मिळाला आहे. संकेतस्थळावर थांबा दिसू लागल्याने येथील बुकिंगचे अधिकृत रेकॉर्ड तयार होऊन ही गाडी कायम होईल. - उमेश शहा, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप