महापालिकेला बेबनावाचा शाप
By Admin | Updated: July 9, 2016 00:54 IST2016-07-08T23:47:05+5:302016-07-09T00:54:38+5:30
जयंत पाटील : काँग्रेसमध्ये गोंधळच

महापालिकेला बेबनावाचा शाप
सांगली : महापालिका काँग्रेसच्या ताब्यात असतानाही पक्षात बेबनाव आहे. मागच्या सत्ताकाळापासून सत्ताधाऱ्यांना बेबनावाचा शाप लागला आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. एकाच पक्षाची सत्ता असताना इतका गोंधळ सुरू आहे. त्यापेक्षा महाआघाडी बरी, अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत असल्याचेही ते म्हणाले.
महाआघाडीच्या सत्ताकाळात शेवटच्या वर्षभरात जयंत पाटील व माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला होता. त्याची सल अजूनही जयंतरावांच्या मनात आहे. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाच्या कारभारावर टीका करताना जयंतरावांनी महाआघाडीच्या शेवटच्या काळात घडलेल्या राजकीय नाट्याचा उल्लेख केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना बेबनावाचा शाप लागला आहे. मागच्या टर्मपासून हा शाप लागला आहे. सांगलीच्या जनतेने काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. पण काँग्रेसमध्येच गोंधळ सुरू आहे. त्यापेक्षा महाआघाडीची सत्ता बरी, असे लोकच म्हणू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
वारणा पाणी योजनेबाबत ते म्हणाले की, महाआघाडीच्या सत्ताकाळात ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडताना या जलशुद्धीकरण केंद्राचे थोडेच काम बाकी होते. ते पूर्ण झाले असते तर सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळाले असते. महाआघाडीच्या काळात पाणी, घरकुल अशा विविध योजना हाती घेतल्या होत्या. या योजना पूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेसला पेललेले नाही. सांगलीच्या विकासासाठी आम्ही कोट्यवधी
रुपये आणले. पण ते खर्च करायलाही सत्ताधाऱ्यांना जमले नाही. सत्ता चालविण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
जि. प. अध्यक्ष : निवड सर्वानुमते
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तासगावला देण्याचा निर्णय आर. आर. पाटील असतानाच घेतला होता. तासगाव तालुक्यातील कोणत्याही इच्छुकाचे नाव आपण घ्यायचे नाही, अशी भूमिका सुरूवातीपासूनच ठेवली होती. हा निर्णय तासगावचाच होता. प्रदेश राष्ट्रवादीने अध्यक्ष निवडीसाठी खास विश्वासू पक्षनिरीक्षक पाठविले होते. त्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला. आमदार सुमनताई पाटील या नाराज असल्याबद्दल आपणाला काहीच माहिती नाही. आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. या निवडीवर कोणीच नाराज नसेल. सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत पक्षनिरीक्षकांनी सदस्यांची मते अजमावली आहेत, असेही पाटील म्हणाले.
स्वीकृत संचालक निवडी लवकरच
जिल्हा बँकेची निवडणूक होऊन वर्ष झाले तरी, अद्याप स्वीकृत संचालकांची निवड झालेली नाही. याबाबत पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेत दोन स्वीकृत संचालक लवकरच निवडले जातील. त्याबाबत अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचा निर्णय जवळपास झाला आहे. बँकेच्या सभेत या निवडी जाहीर होतील, असेही पाटील यांनी सांगितले.
शुध्द पाणी कधी?
महाआघाडीच्या सत्ताकाळात ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले होते. सत्ता सोडताना या जलशुद्धीकरण केंद्राचे थोडेच काम बाकी होते. ते पूर्ण झाले असते तर सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळाले असते. परंतु, याकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तो प्रकल्प अपूर्ण राहिला, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.