गोगलगार्इंकडून पिकांचे नुकसान

By Admin | Updated: August 24, 2014 22:36 IST2014-08-24T22:21:39+5:302014-08-24T22:36:30+5:30

मिरज पूर्वमधील स्थिती : शेतकरी वर्गात चिंता

Crop damage from snails | गोगलगार्इंकडून पिकांचे नुकसान

गोगलगार्इंकडून पिकांचे नुकसान

टाकळी : टाकळीसह परिसरात शांखी गोगलगाईचा उपद्रव वाढला आहे. ओढे-नाले वाहत असल्याने परिसरात दलदलीचे प्रमाण वाढले आहे. हजारोच्या संख्येने गोगलगाई दलदलीतून बाहेर पडून शेतीक्षेत्रात वावरत आहेत. ओढ्या-नाल्यांच्या कडेला असणाऱ्या शेतातील विविध पिकांचे नुकसान गोगलगार्इंकडून होत असल्याने विविध समस्यांत फसलेले शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.
मिरज पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने ओढे-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पिकेही चांगली वाढलेली आहेत. मात्र दलदलीचे प्रमाण वाढल्याने गोगलगार्इंचे दर्शन मोठ्याप्रमाणात होत आहे. या गोगलगार्इंकडून टाकळी, बोलवाड, गणेशनगर, मल्लेवाडी, एरंडोली या भागामध्ये द्राक्ष, दोडका, कारली, वांगी, ढबू, फ्लॉअर, शेंगा, मिरची या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले जात आहे. गोगलगार्इंकडून पिकांच्या सालीसह फळ खाल्ले जात असल्याने संपूर्ण झाड वाळत आहे. द्राक्षपिकाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. गोगलगार्इंकडून द्राक्षवेलीवरील काडीची साल खाल्ली गेल्याने फळछाटणीला आलेल्या काड्या वाळत आहेत. पाच ते सहा फूट उंच असणाऱ्या द्राक्षवेलींवरही गोगलगार्इंचा वावर आहे. द्राक्षबागेवर मारण्यात येणाऱ्या औषधांचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सहा इंचापर्यंत असणाऱ्या गोगलगार्इंवर मोठे शंख आहेत. ओढ्या-नाल्यांच्या परिसरात गोगलगार्इंची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. औषध मारल्यास थोड्यावेळासाठी त्या शंकात लपून बसतात व परत बाहेर येतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. त्यासाठी घरगुती उपाय म्हणून तंबाखूचे धुसर शेतकऱ्यांकडून शेतात टाकले जात आहे. त्यातून काही प्रमाणात गोगलगाई कमी होत असल्या तरी दुसऱ्यादिवशी हजारोंच्या संख्येने गोगलगाई शेतात फिरत असताना दिसतात. काही शेतकरी सकाळी मजूर लावून गोगलगाई वेचून पुरून टाकत आहेत. तरीही गोगलगार्इंची संख्या कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)

गोगलगार्इंकडून द्राक्ष फळछाटणीसाठी तयार करण्यात आलेल्या काड्यांच्या साली खाल्ल्या जात आहेत. त्यामुळे गोगलगार्इंचा ज्या क्षेत्रात वावर आहे, तेथे द्राक्ष उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे द्राक्ष शेतकरी श्रीकांत कौलगे यांनी सांगितले.

Web Title: Crop damage from snails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.