गाईचे कातडेप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: December 25, 2014 00:09 IST2014-12-24T22:27:46+5:302014-12-25T00:09:56+5:30
मिरजेत कारवाई : ३४ लाखांचा माल जप्त

गाईचे कातडेप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा
मिरज : मिरजेत गाईचे कातडे असल्याच्या संशयावरून सुमारे १५ टन कातडे व ट्रक असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन परप्रांतीयांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिरजेतील उदगाव वेस येथे के. ए. ०१ एबी ३८६८ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये चेन्नईला पाठविण्यासाठी कातडे भरले होते. पीपल्स फॉर अॅनिमलचे अशोक लकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ट्रकमध्ये गाईचे व बैलाचे कातडे असल्याची पोलिसांकडे तक्रार केली. मिरजेतून चेन्नईतील एम. ईब्राहीम या व्यापाऱ्याकडे हे कातडे पाठविण्यात येत होते. पोलिसांनी २३ लाख ७५ हजार रूपयांचे कातडे व दहा लाखांचा ट्रक जप्त केला आहे. ट्रकमधील कातडे कोणत्या प्राण्यांचे, याचा अहवाल अद्याप पशुवैद्यक तज्ज्ञांकडून पोलिसांना मिळालेला नाही. मात्र लकडे यांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने ट्रकचालक राजेंद्रन जी गोविंदन (वय ४५), शिवकुमार गोविंद स्वामी (४०, रा. मिन्नुर, जि. वेल्लोर, तामिळनाडू), ट्रकमध्ये कातडे भरणारा संजय रघुनाथ सोनवणे (४२, रा. उदगाव वेस) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या कातड्याची व ट्रकची किंमत सुमारे ३४ लाख रूपये आहे. कातडे दोन दिवसात सडण्याची शक्यता असल्याने त्याच्या विल्हेवाटीबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. कातड्याच्या विल्हेवाटीसाठी उद्या न्यायालयाकडे पुन्हा परवानगी मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)