क्रेडिट सोसायटीने गाशा गुंडाळला ?

By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:36:34+5:302014-08-22T00:52:38+5:30

इस्लामपुरात संभ्रम वाढला : ठेवीदारांचे धनादेश न वटल्याचा परिणाम

Credit Society wrapped up the gaasha? | क्रेडिट सोसायटीने गाशा गुंडाळला ?

क्रेडिट सोसायटीने गाशा गुंडाळला ?

अशोक पाटील - इस्लामपूर -खानदेशात मुख्य शाखा असलेल्या मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इस्लामपूर शाखेने ठेवींच्या बदल्यात दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. येथील शाखा व्यवस्थापक दोन दिवसांपासून अज्ञातवासात गेले असून, अल्पबचत (पिग्मी) एजंटांचे मोबाईल ‘नॉट रिचेबल’ आहेत. शाखेतील कर्मचाऱ्यांकडून पैसे उपलब्ध नाहीत, असे उत्तर दिले जात आहे; तर आज, गुरुवारी कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही सध्या पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे.
खानदेशातील या मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीने दोन वर्षांपूर्वी शहरातील काळा मारुती मंदिरानजीक थाटामाटात शाखा सुरू केली होती. या संस्थेच्या शाखा राज्यासह परराज्यांत आहेत. प्रारंभी जादा व्याजाचे आमिष दाखवून लाखो रुपयांच्या ठेवी गोळा करण्यात आल्या. शहरातील अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी पिग्मी सुरू केली होती.
शहरातील चहा व्यावसायिक शबाब रसूल मुल्ला व त्यांचे बंधू मुआजम रसूल मुल्ला यांनीही पिग्मी सुरू केली होती. काही कामानिमित्त त्यांना पैशाची गरज पडली. त्यांनी पिग्मी एजंटाकरवी पैशाची मागणी केली. त्यावेळी त्यांना संस्थेने / (पान १ वरुन) अनुक्रमे ४४ हजार व नऊ हजार रुपयांचे खासगी बँकेचे धनादेश दिले; परंतु संबंधित खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याचे कारण दाखवत बँकेने ते परत पाठविले. या घटनेमुळे मुल्ला बंधूंना धक्का बसला आहे. अशीच परिस्थिती अनेक खातेदारांची झाली असून, खातेदारांनी संस्थेमध्ये ठिय्या मारून पैशांसाठी तगादा लावला आहे.
दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने शाखेस भेट दिली असता, तेथे रेखा धोंडिराम मदने ही महिला पिग्मीचे पैसे मागण्यासाठी आल्याचे दिसले. तिचा मुलगा आजारी असून त्याच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. या उपचारासाठी पैशांची गरज पडल्याने तीन दिवसांपासून ती पैशांची मागणी करीत आहे; परंतु येथील कर्मचारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने जाब विचारताच १५ हजारांपैकी कसेबसे दोन हजार रुपये देण्यात आले. या शाखेत सध्या तीन कर्मचारी कार्यरत असून, त्यांचा दोन महिन्यांचा पगारही थकल्याचे समजले.
या कर्मचाऱ्यांनी नावे सांगण्यास नकार देत, उद्यापासून शाखाच उघडणार नसल्याचे स्पष्ट केले. या संस्थेबाबत संशयाचे वातावरण असून ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.





खातेदारांची बोळवण
संस्थेच्या काही खातेदारांनी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, १ सप्टेंबरपर्यंत संस्थेला मोठे कर्ज मंजूर होणार असून, १५ तारखेपर्यंत सर्व ठेवीदारांना पैसे देण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Credit Society wrapped up the gaasha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.