आटपाडीतील सिमेंट काँक्रिट रस्त्याचा श्रेयवाद रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:47+5:302021-09-21T04:29:47+5:30
आटपाडी : आटपाडी शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या श्रेयवादावरून आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर कलगीतुरा ...

आटपाडीतील सिमेंट काँक्रिट रस्त्याचा श्रेयवाद रंगला
आटपाडी : आटपाडी शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या श्रेयवादावरून आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून, आमच्याच प्रयत्नातून हा रस्ता होणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून आटपाडी तालुक्यातील सिमेंट काँक्रिटचा चारपदरी रस्ता इतर ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे अधिकाऱ्यांना जाब विचारत आंदोलन केले. एका युवा नेत्याने, अधिकारी व ठेकेदार जोपर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता करत नाहीत, तोपर्यंत महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, दुसऱ्या गटाच्या नेत्यानेही बांधकाम विभाग व महामार्ग बनविणाऱ्या कंपनीविरोधात आंदोलन करत, आटपाडी शहरातून जात असणारा महामार्ग हा आटपाडीच्या शहराबाहेरूनच नेत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून आटपाडी शहरातील रस्त्याचा प्रश्न सोडविल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
चाैकट
खोट्या गुन्ह्यांचीही चर्चा
दोन दिवसांपूर्वी महामार्ग बनविणाऱ्या कंपनीने रस्त्याच्या कामासाठी वाहने आटपाडीच्या महामार्गावर आणली होती. यामुळे एका राजकीय गटाने जोरदार आंदोलन करत वाहनांची तोडफोड केली होती. वाहनांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी राजकीय घडामोडी घडत खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला होता. या गुन्ह्यातून कार्यकर्त्यांची सुटकाही केली आहे. आता दोन्ही गटाचे प्रमुख कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयवादासाठी सरसावले आहेत.