सुरक्षा रक्षक ठेक्यावरून महासभेत गदारोळ
By Admin | Updated: August 21, 2014 00:27 IST2014-08-20T23:31:12+5:302014-08-21T00:27:08+5:30
सत्ताधारी-विरोधक भिडले : करारपत्र बोगस असल्याचा आरोप : महाआघाडीच्या काळात निविदा

सुरक्षा रक्षक ठेक्यावरून महासभेत गदारोळ
सांगली : महापालिकेच्या सुरक्षा रक्षक ठेक्यावरून आज, बुधवारी महासभेत गदारोळ झाला. विरोधी राष्ट्रवादीने मंजूर ठेका एकाला आणि करारपत्र मात्र दुसऱ्यासोबतच केले आहे. त्यामुळे हा ठेका रद्द करून बोगस करारपत्र करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. याच ठेकेदाराला प्रतापसिंह उद्यानाचे काम दिल्याचे निदर्शनास आणून देताच काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले. सुरक्षा रक्षक ठेक्यावरील चर्चेला विरोध नाही, पण विषयांतर करून विरोधकांकडून दिशाभूल सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. यावरून गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती राजेश नाईक, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व गौतम पवार यांच्यात जोरदार वाद झाला. अखेर आयुक्तांनी या ठेक्यातील अनियमिततेबद्दल चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले.
महापौर कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली. सभेत प्रश्नोत्तराच्या तासात सुरेखा बंडगर यांनी सुरक्षा रक्षक ठेक्यातील गोलमाल उघड केला. त्या म्हणाल्या की, सुरक्षा रक्षक ठेक्याची निविदा जाधव यांच्या नावावर मंजूर आहे, तर प्रशासनाने केंपवाडे या ठेकेदाराशी करार केला आहे. मूळ निविदाधारकांशी करारच झालेला नाही, असा मुद्दा मांडला. दिग्विजय सूर्यवंशी यांनी करारपत्र बोगस असून याच ठेकेदाराला प्रतापसिंह उद्यानाच्या सुशोभिकरणाचा ठेका दिल्याचे सांगितले. यावरून काँग्रेसचे किशोर जामदार, राजेश नाईक आक्रमक झाले. उद्यान व सुरक्षारक्षक हे दोन्ही विषय वेगळे आहेत. सभागृहाची दिशाभूल करू नका. सुरक्षा रक्षक पुरवठा ठेक्यावर आपले म्हणणे मांडा, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. नगरसेवक विष्णू माने यांनी यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण जामदार यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांनाही माघार घ्यावी लागले. त्यात गौतम पवार यांनीही याच मुद्द्याला हात घालताच, राजेश नाईक व पवार यांच्यात बाचाबाची झाली.
विष्णू माने म्हणाले की, ठेकेदाराशी झालेल्या करारपत्रात दोष आहेत. त्यामुळे ठेका रद्द करून मानधनावर रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. शेडजी मोहिते यांनी ठेक्याची मुदत संपली असून त्याला मुदतवाढ देऊ नये, अशी सूचना मांडली. गौतम पवार यांनी या विषयावर पूर्वी सभेत चर्चा झाली होती. ठेकेदारांकडून जादा घेतलेल्या दोन लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्याचे इतर ठेकेही रद्द करावेत, अशी मागणी केली.
सुरेश आवटी यांनी एकाच दिवशी ठेकेदाराला समज, वर्कआॅर्डर दिली आहे. त्यामुळे ठेक्यात गोलमाल झाला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अखेर आयुक्त अजिज कारचे यांनी यातील अनियमिततेबद्दल चौकशी करून महासभेकडे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच ठेक्याची मुदत जुलैमध्ये संपली आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. शासनाच्या नव्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षक मंडळाकडे गार्ड पुरविण्यासाठी पत्र दिल्याचा खुलासाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)