coronavirus : इस्लामपुरातील पहिले चार कोरोनामुक्त रुग्ण घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:14 PM2020-04-20T20:14:12+5:302020-04-20T20:21:12+5:30
एकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते. तेथून आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली.
इस्लामपूर - शहरातील कोरोनाबाधित ठरलेले पहिले चार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सोमवारी महिन्याभरानंतर घरी परतले. शासकीय रुग्णवाहिकेतून या सर्वांना गांधी चौक परिसरातील घरी आणण्यात आले. कोरोनावर मात करत या चौघांनी प्रबळ शारीरिक प्रतिकारशक्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवले.
एकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते. तेथून आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. परदेश प्रवास करून आल्याने त्यांना घरीच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे त्यांनी कानाडोळा केल्याने त्यांना मिरज येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात २१ मार्चच्या सायंकाळी दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. २३ मार्चला चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरासह जिल्हा हादरून गेला. तेव्हापासून त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या पुन्हा तपासण्या करण्यात आल्या. हे चौघेही कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल आला. तेथील आणखी १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या चौघांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्वांच्या आगमनापूर्वी आरोग्य यंत्रणेने संपूर्ण घराचे निर्जंतुुकीकरण करुन घेतले होते. घरातील सर्व भांडी व इतर साहित्यही निर्जंतुक करण्यात आले. घरी आल्यानंतर या चौघांना आरोग्य यंत्रणेमार्फत मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज देण्यात आले. घराच्या स्वच्छतेसाठीचे औषधही पुरविण्यात आले आहे. या सर्वांना आणखी १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत दिवसातून दोनवेळा गृहभेट घेऊन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
चौघांचा प्रवास
१३ मार्चला सकाळी दिल्ली येथून मुंबई विमानतळावर आगमन.
१३ मार्चला दिवसभर मुंबईत वास्तव्य.
१४ मार्चला सकाळी इस्लामपूर येथे आगमन.
१४ ते १८ मार्च शहरात कुटुंबीय, नातेवाईकांसह इतरांशी भेटीगाठी.
१९ मार्च सर्दी, खोकला आल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी. तेथे परदेश प्रवासामुळे घरी थांबण्याच्या सूचना; मात्र याकडे कानाडोळा करत २१ मार्चपर्यंत पुन्हा घराबाहेर वावर.
२१ मार्चच्या सायंकाळी पोलीस बळाचा वापर करत सर्वांची मिरज येथे उपचारासाठी रवानगी.
२२ मार्चला चौघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले.
२३ मार्चला सायंकाळी हे सर्व चौघे कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याचा अहवाल प्राप्त.
२० एप्रिल उपचारानंतर महिन्याभराने निवासस्थानी आगमन