CoronaVirus : तासगावात मास्क जनजागृतीसाठी डॉक्टर्स उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:44 IST2020-05-27T16:41:49+5:302020-05-27T16:44:38+5:30
सध्या सगळीकडे लॉकडाऊन थोडे शिथिल केले आहे. त्यामुळे लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. परंतु अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तासगाव येथील युनायटेड बीएएमएस डॉक्टर्स संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स सोशल डिस्टन्सिंग पाळून रस्त्यावर उतरले.

CoronaVirus : तासगावात मास्क जनजागृतीसाठी डॉक्टर्स उतरले रस्त्यावर
तासगाव : सध्या सगळीकडे लॉकडाऊन थोडे शिथिल केले आहे. त्यामुळे लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. परंतु अजून कोरोनाचा धोका संपलेला नाही. याअनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तासगाव येथील युनायटेड बीएएमएस डॉक्टर्स संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स सोशल डिस्टन्सिंग पाळून रस्त्यावर उतरले.
डॉक्टरांनी शहरातील चौका-चौकात थांबून, हातात बॅनर घेऊन लोकांना मास्क लावण्यासंदर्भात व वारंवार हात धुण्याबाबत हात जोडून विनंती केली. तासगावच्या जनतेनेही डॉक्टरांच्या या विनंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मास्क नसणाऱ्या लोकांना संघटनेच्यावतीने मास्कचे वाटप करण्यात आले. संघटनेच्यावतीने दर रविवारी हा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ. शिवणकर यांनी सांगितले.
यावेळी तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक निरीक्षक पंकज पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी स्वत: हातात बॅनर घेऊन डॉक्टरांच्या या उपक्रमात सहभाग घेतला.
डॉ. स्वाती पाटील, डॉ. निशिकांत सूर्यवंशी, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. सविता पंडित, डॉ. रेखा पाटील, डॉ. आशिष पाटील, डॉ. पवन कुमार शिरोटे, डॉ. अजित माने, डॉ. तौफिक मुजावर, डॉ. शीतल पाटील, डॉ. संतोष पाटील, डॉ. शब्बीर मुलाणी, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. वैभव बरगुले, डॉ. विजय माने, डॉ. मुकुंद पाटील यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन लोकांचे प्रबोधन केले.यावेळी नगरसेवक अॅड. सचिन गुजर, किशोर गायकवाड, स्वच्छता निरीक्षक प्रताप घाडगे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.