कोरोनाचा मुक्काम लांबला आणि कंत्राटींच्या नोकऱ्याही टिकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:36+5:302021-06-26T04:19:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे, पण आरोग्य विभागातील कंत्राटी ...

कोरोनाचा मुक्काम लांबला आणि कंत्राटींच्या नोकऱ्याही टिकल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे, पण आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मात्र चिंतेचे ढग आहेत. कोरोना संपताच त्यांच्या नोकऱ्यादेखील संपुष्टात येणार आहेत. त्यांच्या सुदैवाने आरोग्य विभागाने जुलैअखेर त्यांच्या नोकऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला, त्यामुळे शासनाने कंत्राटी स्वरूपात मेगाभरती केली. डॉक्टर्स, परिचारिका, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदी जागांवर नियुक्त्या केल्या. नियुक्त्या तीन महिन्यांसाठी होत्या. काही नेमणुकांवर पुढील आदेशापर्यंत नियुक्ती, असा उल्लेख होता. डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येताच कंत्राटी नोकऱ्याही संपल्या. एप्रिलमध्ये दुसरी लाट सुरू झाली, तेव्हा शासनाने पुन्हा नियुक्त्या केल्या. जुन्याच तरुणांना प्राधान्य दिल्याने पुन्हा रोजगार मिळाला.
आता जूनच्या मध्यापर्यंत दुसरी लाटही संपण्याची चिन्हे दिसू लागल्याने तरुणांवर पुन्हा बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. कोरोनाच्या निमित्ताने त्यांना काही महिन्यांसाठी शासकीय सेवेची संधी मिळाली होती. सरकारी कार्यपद्धतीची ओळख झाली होती. तंत्रस्नेही असल्याने संगणकीय कामांचा वेगही जास्त होता. महिन्याकाठी चांगले मानधन मिळत असल्यानेही समाधानी होते. आता कोरोना ओसरू लागल्याने नोकऱ्या पुन्हा बंद होणार होत्या. पण, त्यांच्या सुदैवाने कोरोनाचा मुक्काम वाढल्याने तूर्त नोकऱ्यांना जीवदान मिळाले आहे. जुलैअखेरपर्यंत त्यांना मुदतवाढीचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
पॉइंटर्स
पहिली लाट
जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले ४१६
नंतर किती जणांना कमी केले ४१६
दुसरी लाट
जिल्ह्यात किती कंत्राटी कर्मचारी घेतले ५५०
नंतर किती जणांना कमी केले ००
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या कामावर कर्मचारी ५५०
कोट
शासकीय भरतीवेळी प्राधान्य द्यावे
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केले. शासकीय कामकाजाचा अनुभव घेतला. त्यामुळे भविष्यात आरोग्य विभागात भरती होईल, तेव्हा आमचा विचार प्राधान्याने व्हावा, अशी अपेक्षा आहे. आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागात नोकरभरती जाहीर केली आहे, त्यासाठी आम्हाला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे.
- आशुतोष कोष्टी, कंत्राटी कर्मचारी
गरज लागेल तेव्हा कामावर घेतले जाते. आरोग्य विभागात अन्य कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पडेल ती कामे कंत्राटी कर्मचारी करत आहेत. पदानुसार किमान १५ हजारांपासून ६० हजारांपर्यंत मानधन मिळते. अन्य कोणतेही भत्ते किंवा लाभ नाहीत. आमच्यासारख्या शैक्षणिक पात्रताधारक तरुणांचा शासनाने कायम नियुक्त्यांसाठी विचार केला पाहिजे.
- रवींद्र कांबळे, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाकाळात कोणतेही काम करण्यास आम्ही हयगय केली नाही. दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत, त्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने नेमणुका दिल्या पाहिजेत. कायम कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण आहे, कंत्राटींना मात्र मानधनाव्यतिरिक्त कोणताही लाभ नाही. कोविड कक्षात जीवाची जोखीम घेऊन आम्ही कामे करत आहोत, याचा विचार शासनाने करायला हवा. मानधनाव्यतिरिक्त कोणताही लाभ मिळत नाही.
- मनीषा जाधव, कंत्राटी कर्मचारी
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या अद्याप पूर्णत: नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळाची गरज कायम आहे. सध्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत जूनअखेर होती. पण, कोरोनाचा फैलाव नियंत्रणात नसल्याने कर्मचाऱ्यांना महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. जुलैअखेरपर्यंत त्यांची नियुक्ती कायम ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी, सांगली जिल्हा परिषद.