लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे रविवारी एकाच दिवसात ६४ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सोमवारी शिवाजीनगर परिसर सिल करण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपाययोजनांचे आखणी केली व या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
शिवाजीनगर परिसर कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनल्याने या ठिकाणी राहाणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासण्या करण्याचे काम सोमवारी दिवसभर आरोग्य विभागाच्या वतीने सुरू होते. रविवार एकाच दिवसात ६४ कोरोना रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार रवींद्र सबनीस, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. साकेत पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे यांनी भेट देऊन सूचना केल्या. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
माजी सरपंच शिवाजी वाटेगावकर, उपसरपंच शकिल मुल्ला, प्रमोद शिंदे, पोलीस पाटील पद्मा गिरिगोसावी, बादशाह नदाफ, संदीप वाकसे, अरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.