दिघंची परिसरात कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:40+5:302021-04-30T04:33:40+5:30

फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे भाजी मंडई परिसरात होत असलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. लोकमत ...

Corona's havoc in the area of Dighan | दिघंची परिसरात कोरोनाचा कहर

दिघंची परिसरात कोरोनाचा कहर

फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे भाजी मंडई परिसरात होत असलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंचीसह परिसरात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून, कोरोनाबाधितांची संख्या आवाक्याबाहेर चाललेली आहे. दिघंची, पुजारवाडी, उंबरगाव, पळसखेल, लिंगीवरे, राजेवाडी या ग्रामपंचायतींच्या ग्राम दक्षता समित्यांकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्यानेच कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. दिघंची वगळता इतर कोणत्याही ग्रामपंचायतीने औषध फवारणी केलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाढतच असून, घातक ठरत आहे. दिघंचीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरिक विनाकारण व विनामास्क फिरत आहेत. काही दुकानदार अर्धे शटर उघडून दुकाने सुरू ठेवत आहेत. या दुकानदारांना चाप कोण लावणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिघंची हे तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्तच असल्याने दिघंची हे गाव सुपर स्प्रेडर ठरत आहे, तर दिघंचीसह चौदा गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. राजेवाडी चौक, भाजी मंडई, पेट्रोल पंप व बसस्थानक परिसर या ठिकाणी विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दिघंचीत दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. याचे कसलेही गांभीर्य दिघंचीकरांना नाही. तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्ती मोकाटपणे गावात फिरत असल्याने कोरोनाचा धोका वाढत असल्याची चर्चा दिघंचीत सुरू आहे.

हे होणे गरजेचे

ग्राम दक्षता समित्या सक्रिय कराव्यात

जनता कर्फ्यू लागू करावा

औषध फवारणी करावी

नियम मोडल्यास दंड

Web Title: Corona's havoc in the area of Dighan