corona virus: Unique table robot by Sangli youth | corona virus : सांगलीतील तरुणांनी साकारला अनोखा टेबल रोबोट

corona virus : सांगलीतील तरुणांनी साकारला अनोखा टेबल रोबोट

ठळक मुद्देसांगलीतील तरुणांनी साकारला अनोखा टेबल रोबोट मिरजेच्या कोविड रुग्णालयात प्रयोग यशस्वी

अविनाश कोळी

सांगली : कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी रुग्णसेवेमध्ये निर्माण झालेल्या अडचणींवर मात करीत सांगलीतील काही तरुणांनी अथक् प्रयत्नांमधून अनोखा टेबल रोबोट साकारला. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णापासून दूर राहूनही त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना औषधांचा डोस देणे, त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरविणे या रोबोटमुळे शक्य झाले आहे. मिरजेच्या कोविड रुग्णालयात या रोबोटचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधणाऱ्या सांगलीतील अक्षय रेवणकर, ऋषभ चौगुले, पूजा काशीद, अभिषेक सुतार, स्वराज चव्हाण, मैत्रेय गोखले या सहा तरुणांना कोरोनाने संधी दिली. कोरोना काळात कोविड रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या जिवाची एकीकडे घालमेल, तर दुसरीकडे रुग्णांना वाटू लागलेली गैरसोयीची भीती, अशा दोन्ही गोष्टींवर मार्ग काढत या तरुणांनी एक दूत रोबोट तयार केला.

त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन या रोबोटची माहिती दिली. त्यांना या रोबोटबद्दल कुतूहल वाटले. कोविड रुग्णालयात याचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले. प्रयोगावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही अपेक्षा रोबोटबाबत व्यक्त केल्या. त्या अपेक्षांमधून रोबोटमध्ये बदल होत गेले आणि एक परिपूर्ण सेवेकरी रोबोट तयार झाला.

डॉक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्यात हा रोबोट एक दूत असल्याप्रमाणे काम करीत असल्याने, त्याचे नामकरण दूत रोबोट असे करण्यात आले. अल्पावधितच या रोबोटने रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मने जिंकली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या आदेशाने मागील २0 दिवसांपासून हा रोबोट मिरज कोविड रुग्णालयात वापरला जात आहे. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाकवच म्हणून हा रोबोट काम करीत आहे.

हा रोबोट बनविण्यासाठी तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे आवश्यक साहित्य मिळणे कठीण बनले होते. येथील उद्योजक अजय खांबे यांनी या तरुणांना आवश्यक मदत व साहित्य पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. याकामी मिरज सिव्हिलमधील परिचारिका वंदना शहाणे यांनीही त्यांना सहकार्य केले.

एकावेळी ३0 रुग्णांची सेवा

एकदा चार्ज केल्यानंतर हा रोबोट ३0 रुग्णांची दिवसभरातील सर्व सेवा पुरविण्यास सक्षम आहे. डॉक्टर व परिचारिकांना केवळ या टेबल रोबोटमध्ये आवश्यक गोष्टी ठेवून कमांड द्यावी लागते.


रोबोटची वैशिष्ट्ये

  • या रोबोटमध्ये ४ ट्रेज् आहेत, ज्यामध्ये ८ ताटे ठेवता येऊ शकतात.
  • रोबोटच्या दर्शनी बाजूस स्क्रीन बसविण्यात आला आहे.
  • या स्क्रीनद्वारे डॉक्टर, कर्मचारी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलप्रमाणे बोलू शकतात.
  • यामध्ये ७ इंची डिस्प्ले आणि दोन्ही बाजूस कॅमेरा बसविला आहे.
  • छोट्या जागेतूनही हा रोबोट सहज जाऊ शकतो
  • एकदा सेवा दिल्यानंतर रोबोट पूर्ण सॅनिटाईज केला जाऊ शकतो. याला १२ व्होल्ट आॅपरेटेड बॅटरी आहे.
  • चार्ज करण्यासाठी कमित कमी कालावधी लागतो.

Web Title: corona virus: Unique table robot by Sangli youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.