corona virus -व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये : डॉ. संजय धकाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 14:35 IST2020-03-10T14:32:26+5:302020-03-10T14:35:01+5:30
कोरोना व्हायरस व कोंबड्या यांचा काहीही संबंध नाही. कोणताच व्हायरस 56 डिग्री तापमानाच्यावर तग धरू शकत नाही. आपल्याकडे कोणतेही मांस हे शिजवूनच खाल्ले जाते. त्यामुळे सदर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.

corona virus -व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये : डॉ. संजय धकाते
सांगली : कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने कोरोना व्हायरस या रोगाची लागण होत असल्याच्या अफवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. मात्र कोरोना व्हायरस व कोंबड्या यांचा काहीही संबंध नाही. कोणताच व्हायरस 56 डिग्री तापमानाच्यावर तग धरू शकत नाही. आपल्याकडे कोणतेही मांस हे शिजवूनच खाल्ले जाते. त्यामुळे सदर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.
सध्या जगात केवळ कोरोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधीत झालेल्या रूग्णांची संख्या वाढत असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुटपक्षी पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर कोंबड्यांचे मांस खाल्ल्यामुळे कोरोनाचा प्रसार होतो अशी चुकीची माहिती प्रसारीत करण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी सांगितले.
मात्र असा कोणताच प्रकार जिल्ह्यात नसून कोंबडीचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत कोरोना व्हायरस विषयी जिल्ह्यात जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. संजय धकाते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.