corona virus :रूग्णाची फरफट करणाऱ्या रूग्णालयांना प्रशासनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:25 IST2020-08-11T18:23:50+5:302020-08-11T18:25:33+5:30
महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्स ची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये दाखल करून न घेणे याचा लेखी खुलासा जिल्हा प्रशासनाने संबंधित रूग्णांलयांकडून मागविला आहे

corona virus :रूग्णाची फरफट करणाऱ्या रूग्णालयांना प्रशासनाची नोटीस
सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्स ची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये दाखल करून न घेणे याचा लेखी खुलासा जिल्हा प्रशासनाने संबंधित रूग्णांलयांकडून मागविला आहे.
रूग्णांची हेळसांड कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नाही. अचानकपणे येणाऱ्या गंभीर स्थितीतील रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पीटल्सनी काही बेड्स राखीव ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वारंवार दिल्या आहेत. असे असतानाही दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 या कालावधीत एका रूग्णास कुल्लोळी रूग्णालय, भारती हॉस्पीटल, सेवासदन हॉस्पीटल, विवेकानंद हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, सिव्हील हॉस्पीटल मिरज, मेहता हॉस्पीटल या सर्व रूग्णांलयांमध्ये ॲडमीट करून घेतले नाही. अशी तक्रार नातेवाईकांनी केली आहे.
वास्तविक रूग्णालयातील बेड्स ची अद्ययावत माहिती रूग्णांना उपलब्ध व्हावी म्हणून बेड मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात आली आहे. रूग्णालयांच्या मार्फत यामध्ये आयसीयु व जनरल वॉर्ड मधील बेड्स ची संख्या सातत्याने अद्ययावत केली जाते. तसेच जनरल वॉर्डमधील पॉझीटीव्ह रूग्ण व संशयीत रूग्ण यांच्या माहिती बाबतही दैनंदिन अहवाल घेण्यात येतो.
असे असतानाही अत्यावस्थ स्थितीतील रूग्णास सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत यातील एकाही हॉस्पीटलने ॲडमीट करून घेतले नाही या बाबीची गंभीर दखल घेऊन वरील सर्व रूग्णांलयांना नोटीस बजावण्यात आल्या असून यामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.