कोरोनाबाधितांचा कामेरीत बिनधास्त रस्त्यावर वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:53+5:302021-06-04T04:20:53+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रस्त्यावरुन बिनधास्त वावर सुरु असल्याचे चित्र आहे. घरगुती साहित्य आणण्यासाठीही ...

कोरोनाबाधितांचा कामेरीत बिनधास्त रस्त्यावर वावर
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रस्त्यावरुन बिनधास्त वावर सुरु असल्याचे चित्र आहे. घरगुती साहित्य आणण्यासाठीही पॉझिटिव्ह रुग्ण दुकानामध्ये जात असल्याचे दिसत आहे. या बिनधास्त फिरणाऱ्या कोरोना रुग्णांवर कठोर कारवाई ग्रामपंचायतीने करण्याची गरज आहे. गुरुवारी नवीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
दुसऱ्या लाटेत गुरुवारअखेर रुग्णांचा आकडा ३६७ झाला आहे. त्यापैकी ९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर ७० रुग्ण गृह अलगीकरणात तर उर्वरित शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णाला चहा पिण्याची इच्छा झाली आणि तो चक्क त्यांना जेवण पुरवणाऱ्या व्यक्तीच्या घरी गेला. मात्र, तो बाधित असल्याची त्यांना माहिती असल्याने त्यांनी चहा देण्यास नकार दिला. विलगीकरण कक्षातील एक रुग्ण चार दिवसांपूर्वी डोके दुखत असल्यामुळे मेडिकलमध्ये औषधे खरेदीसाठी गेला होता. गृह अलगीकरणामधील एक रुग्ण काल घराजवळच्या दुकानात दाढी करण्यासाठी ब्लेड आणण्यास गेला होता. गुरुवारी एक रुग्ण किराणा माल खरेदीसाठी गेला होता. काही गृह अलगीकरणातील रुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा कामेरीत पुन्हा फैलाव होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोकाट फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट फिरणाऱ्या रुग्णांविरोधात ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.