डॉक्टरांसह १४३५१ कर्मचाऱ्यांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:50+5:302021-02-11T04:28:50+5:30
शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आणि खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार १३ हजार २५५ ...

डॉक्टरांसह १४३५१ कर्मचाऱ्यांना कोरोना लस
शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय आणि खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार १३ हजार २५५ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस दिली आहे. उर्वरित काही खासगी डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास फारसा प्रतिसाद दिसत नाही. यामुळे लसीकरणात राज्यात सांगली मागे दिसत आहे. आरोग्य यंत्रणेचे ५० टक्केपेक्षा जास्त लसीकरण झाल्यामुळे शासन कोरोना संकटात रस्त्यावर येऊन नागरिकांना सेवा देत होते. अशा स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, महसूल, पोलीस यांच्यासह अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने २९ हजार ९०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये पोलिसांची नोंदणी झालेली नाही. या अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी एक हजार ९६ कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.
शासनाकडून जिल्ह्यासाठी ५८ हजार व्यक्तींना पुरेल एवढीच लस दिली आहे. या लसीतून प्रथम लस दिलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना दुसरा डोस देण्यासाठी वापर होणार आहे. यामुळे ३० हजार व्यक्तींनाच पुरेल एवढी लस सध्या उपलब्ध आहे. शासनाकडून नवीन लसीचा पुरवठा होईल, तेव्हाच शिल्लक व्यक्तींचे लसीकरण होणार आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कोट
कोरोना प्रतिबंधक लसीचे पहिल्या टप्प्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण ६० टक्केपेक्षा जास्त झाले आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील महसूल, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेसह अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनामध्ये पुढे होऊन काम केले आहे. यांची संख्या २९ हजार ९०० असून, त्यांचेही लसीकरण सुरू केले आहे.
-डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.