इस्लामपुरात दोन दिवसांत रस्त्यावर ३३२ जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:47+5:302021-07-01T04:18:47+5:30
इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत शहरातील विविध ठिकाणी रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसांत भाजी मंडईतील १६२ जणांच्या, ...

इस्लामपुरात दोन दिवसांत रस्त्यावर ३३२ जणांची कोरोना चाचणी
इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत शहरातील विविध ठिकाणी रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसांत भाजी मंडईतील १६२ जणांच्या, तर शहरात इतर ठिकाणी १७० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तथापि त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार केले जात नसल्याचे दिसून आले.
वाळवा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आरोग्य खात्याला यश आलेले नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आणि रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची उपजिल्हा रुग्णालयामार्फत अँटिजन चाचणी केली जात आहे. दि. २९ रोजी भाजी बाजारात ७७ जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये नऊ नागरिक कोरोनाबाधित निघाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी जाण्यास सांगण्यात आले. बुधवार, दि. ३० रोजी भाजी बाजारामध्ये ८५ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तिघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय शहरातील विविध ठिकाणी दोन दिवसांत १७० जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. संपूर्ण शहरात एकूण ४१ जण कोरोनाबाधित सापडले.
बाधित रुग्णांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविणे गरजेचे आहे. परंतु आरोग्य विभाग दिरंगाई करीत आहे. विलगीकरण कक्षात जागा नसल्याने संबंधितांचे सविस्तर पत्ते घेऊन आरोग्य खात्यामार्फत उपचार करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख यांनी सांगितले.
चौकट
नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर
सध्या इस्लामपूर, आष्टा शहरासह कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आरोग्य खात्यापुढे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद असले तरीसुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. त्यामुळेच वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसते.