महिनाभरात वाढले चौपट कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:44+5:302021-03-30T04:16:44+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्या चौपट वाढली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे गांभीर्याने पालन करण्याची ...

महिनाभरात वाढले चौपट कोरोना रुग्ण
सांगली : महापालिका क्षेत्रात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्या चौपट वाढली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. व्यावसायिक आस्थापनांना नियमावली लागू केली आहे. नियम मोडल्यास या आस्थापना सील केल्या जातील. तसेच घरीच विलगीकरणातील कोरोना रुग्णांनीही नियमांचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.
आयुक्त कापडणीस म्हणाले, कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज आहे. मार्च महिन्यात रुग्णसंख्या चौपट झाली आहे. त्यात तीव्र लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यांना घरीच विलगीकरण केले आहे. पण, विलगीकरणात असतानाही काही जण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. अशा रुग्णांच्या घरी सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक भेट देईल. विलगीकरणाचे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. सैनिक संकुलमध्ये १५० बेडचे केअर सेंटर उभारले जाणार आहे.
महापालिकेने स्टेशन चौकात रुग्णवाहिका व शववाहिकासाठी स्वतंत्र केंद्र सुरू केले जाणार आहे. तर, मंगलधाम संकुलात ‘वॉर रूम’ कार्यान्वित केली आहे. खासगी पाच रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांना व्हेंटिलेटर व अन्य आवश्यक मशीन उपलब्ध केल्या जात आहेत. हॉटेल्स, दुकाने यासह वाणिज्यिक आस्थापनांनी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळले पाहिजेत. नियम न पाळल्यास संबंधित हॉटेल, दुकान सील केले जाईल. ओपीडीमध्ये लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास खासगी दवाखान्यांनी तत्काळ महापालिकेशी संपर्क साधावा. कोरोनाची औषधे खरेदी केली जात असतील, तर संबंधित मेडिकलचालकाने महापालिकेला कळवावे. चाचणी, एचआरसीटी, उपचाराचे जादा शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.
चौकट
लसीकरणाला प्रतिसाद
हेल्थ केअर वर्कर्सचे ७० टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. ६० वर्षांवरील २५ टक्के, तर ४५ ते ६० वयोगटांतील २३ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहेे. आजअखेर, ३५ हजार ७०७ व्यक्तींना लस टोचली आहे. त्यापैकी एकाही व्यक्तीला लस टोचल्यानंतर कसलाही त्रास झाला नसल्याचे कापडणीस यांनी सांगितले.
चौकट
तीन महिन्यांतील रुग्णसंख्या
महिना रुग्ण बरे झाले टक्केवारी मृत्यू
जानेवारी १८२ १७८ ९७.८० ४
फेब्रुवारी २०२ २०० ९९.०० २
मार्च ८०५ ४१० ५०.९३ ७