अनिश्चिततेच्या मैदानाबाहेर जोर-बैठका

By Admin | Updated: September 17, 2014 23:05 IST2014-09-17T22:53:54+5:302014-09-17T23:05:31+5:30

सांगली मतदारसंघ : भाजप, कॉँग्रेस उमेदवारांची वाट खडतर

Coordination outside the uncertainty ground | अनिश्चिततेच्या मैदानाबाहेर जोर-बैठका

अनिश्चिततेच्या मैदानाबाहेर जोर-बैठका

अविनाश कोळी - सांगली-- तिकीट कोणाकोणाला मिळणार, बंडखोरी कोण करणार, लढत कोणाकोणाची होणार, आघाडी किंवा महायुती होणार की नाही, जागांची अदलाबदल होणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नसली, तरी इच्छुकांनी मैदानाबाहेर जोर-बैठकांवर जोर दिला आहे. बंडखोर व अपक्ष लढू पाहणाऱ्यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधून वरातीची तयारी केल्याने सांगली विधानसभा मतदारसंघात आता बहुरंगी लढतीची दाट शक्यता दिसत आहे.
गतवेळच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कॉँग्रेस व भाजप यांच्यातच खरी लढत होईल, असे मानले जात असले, तरी मैदानात कोणकोण उतरणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. भाजपकडून संभाजी पवार आणि कॉँग्रेसतर्फे मदन पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी खात्री पक्षीय स्तरावरील कार्यकर्ते व्यक्त करीत असले, तरी त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरही मैदानात उतरणार आहेत. यंदाची राजकीय परिस्थिती गतवेळच्या तुलनेत पूर्णपणे बदलली आहे. कॉँग्रेस व भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष व गटबाजी टोकाला गेली आहे. कोणालाही तिकीट मिळाले तरी, पक्षीय नेते, कार्यकर्ते एकसंधपणे अधिकृत उमेदवाराला मदत करतील, याची कोणतीही शक्यता सध्या दिसत नाही. दोन्ही पक्षात एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार होण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले असले, तरी विधानसभेला भाजपची वाट खडतर असणार आहे. अंतर्गत संघर्ष व बंडखोरांचा त्रास भाजपच्या अधिकृत उमेदवाराला होणार, हे निश्चित. तशीच परिस्थिती कॉँग्रेसची आहे. किंबहुना कॉँग्रेसला याठिकाणी अधिक कष्ट घ्यावे लागतील. गतवेळी या मतदारसंघात कॉँग्रेसचा पराभव झाला होता. गेल्या चोवीस वर्षांत अपवादानेच कॉँग्रेसला याठिकाणी यश मिळाले आहे. त्यामुळे यंदा यशासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यातच पक्षांतर्गत विरोध यावेळी अधिक असण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे भवितव्य केवळ मतविभागणीच्या आकड्यांवर अवलंबून आहे. विरोधी उमेदवाराची, त्याच्या पक्षाची मते विभागली गेली, तरच कॉँग्रेसला फायदा होऊ शकतो, मात्र हीच परिस्थिती कॉँग्रेसच्या बाबतीतही होऊ शकते. कॉँग्रेसच्या मतांची विभागणी झाली, तर पुन्हा विरोधी उमेदवाराला संधी मिळू शकते. या दोन्ही पक्षांची वाट बिकट आहे. त्यामुळेच यंदाच्या रिंगणात अपक्ष व बंडखोरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यंदा सांगलीच्या मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे.

Web Title: Coordination outside the uncertainty ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.