ठेकेदाराला काळ्या यादीत काढणार
By Admin | Updated: January 1, 2015 00:06 IST2014-12-31T22:51:59+5:302015-01-01T00:06:09+5:30
विकासकामे खोळंबली : आयुक्तांकडून हिरवा कंदील; स्थायीत चर्चा शक्य

ठेकेदाराला काळ्या यादीत काढणार
सांगली : महापालिकेला प्राप्त झालेल्या शासकीय निधीतून विकासकामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बड्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. आयुक्त अजिज कारचे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला असून उद्या, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेला गेल्या वर्षी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने विकास कामांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून विविध कामे प्रस्तावित करण्यात आली. महापालिका प्रशासनाने त्यासाठी जाहीर निविदाही प्रसिद्ध केल्या. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने रस्त्यांच्या डांबरीकरणासह विविध कामे मार्गी लागावीत, यासाठी प्रयत्न चालविले होते. पण त्याला यश आले नाही. पालिकेतील अधिकारी-ठेकेदारातील संघर्षामुळे काही कामे अद्यापही खोळंबली आहेत.
माजी मंत्री मदन पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत २० कोटीचा निधी आणला. या निधीतील सव्वा कोटीची कामे एकाच ठेकेदाराने घेतली आहेत. त्यात सांगलीवाडीसह मिरज शहरातील कामांचा समावेश आहे. ही कामे सुरू करण्यासाठी त्या प्रभागातील नगरसेवक दिलीप पाटील, बसवेश्वर सातपुते यांच्यासह सत्ताधारी गट प्रयत्नशील होता. पण ठेकेदाराने सात महिने झाले तरी अद्याप या कामांना सुरूवात केलेली नाही. वारंवार ठेकेदार, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही कामे झालेली नाहीत.
याबाबत मदन पाटील यांच्याकडे नगरसेवकांनी तक्रार केली होती. खुद्द मदनभाऊंनी दूरध्वनीवरून ठेकेदाराशी संपर्क साधून कामे सुरू करण्याचे आदेश दिले. पण त्यालाही ठेकेदाराने कोलदांडा दिला. या प्रकारामुळे गेल्या काही दिवसापासून ठेकेदाराविरोधात नाराजी वाढली होती. आज नगरसेवक दिलीप पाटील व अन्य सदस्यांनी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराविरोधात तातडीने प्रस्ताव मागविला. या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. आता हा प्रस्ताव स्थायी समितीकडे चर्चेसाठी जाणार आहे. उद्या स्थायीच्या सभेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वाद नेमका कोणाशी?
संबंधित ठेकेदाराने कामास टाळाटाळ केल्याने त्याच्यावर कारवाईसाठी नगरसेवक आग्रही आहेत. वस्तुत: या ठेकेदाराचा वाद नेमका कोणाशी आहे, याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती. अधिकाऱ्यांशी वाद असल्याने ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याचे सदस्यांचे मत आहे. ठेकेदार- अधिकाऱ्यांचा संघर्ष कधी मिटणार? असा सवालही उपस्थित होत आहे.