जिल्ह्यात ९५ गावात दूषित पाणी
By Admin | Updated: July 8, 2014 00:41 IST2014-07-08T00:40:36+5:302014-07-08T00:41:48+5:30
ग्रामपंचायतींना नोटिसा : टीसीएल निकृष्ट; सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई

जिल्ह्यात ९५ गावात दूषित पाणी
सांगली : पाणीपुरवठा होत असलेल्या जिल्ह्यातील १६८६ ठिकाणांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ९५ गावांतील पाण्याचे १९० नमुने दूषित आढळले असून संबंधित ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेने नोटीस बजावली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न केल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंचांवर जिल्हा परिषदेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे नमुने घेतले जातात. प्रत्येकवेळी त्याच-त्या गावामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. वारंवार नोटिसा बजावल्यानंतरही ग्रामपंचायतींकडून उपाययोजना होत नसल्याबद्दलही अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
आटपाडी तालुक्यातील माळवाडी, भिंगेवाडी, बोंबेवाडी, माडगुळे, कौठुळी, निंबवडे, दिघंची, हिवतडसह २२ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. या गावांमध्ये टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची आढळल्यामुळे ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. जत तालुक्यातील सोरडी, गुड्डापूर, सनमडी, कोळगिरीसह १५ गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, धुळगाव, कोंगनोळी, शिरटी, कुकटोळी, रांजणी आदी १३ गावे, खानापूर तालुक्यातील बलवडी, खानापूर, जखीणवाडी, ढोराळे, मिरज तालुक्यातील आरग, खटाव, लिंगनूर, संतोषवाडी, डोंगरवाडी, खंडेराजुरी, पलूस तालुक्यातील नागठाणे, आमणापूर, शिराळा तालुक्यातील करमाळे, उपवळे, शेडगेवाडी, मणदूर, सोनवडे, शिराळे, बहिरेवाडी, वाकुर्डे बुद्रुकसह अकरा गावे, तासगाव तालुक्यातील कौलगे, सावर्डे, मांजर्डे, पुणदी, कुमठे, वाळवा तालुक्यातील कासेगाव, कुरळप, चिकुर्डे, ठाणापुडे, नेर्ले, महादेववाडी, सुरुल, शिरटे, रेठरेहरणाक्ष, तांदुळवाडी, येलूर, इटकरे, कणेगाव, बहादूरवाडीसह १६ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. या गावांनी दूषित पाणी पुरवठ्याबद्दल दक्ष राहण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)