जनावरांतही संसर्गजन्य रोगाची साथ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:16+5:302020-12-05T05:05:16+5:30

आफ्रिकेतून आलेल्या लम्पी स्कीन या जनावरांतील देवीसदृश संसर्गजन्य रोगामुळे जनावरांना ताप येऊन त्वचेवर गाठी होतात. कोरोनाप्रमाणेच परदेशातून आलेल्या या ...

Contagious disease in animals; | जनावरांतही संसर्गजन्य रोगाची साथ;

जनावरांतही संसर्गजन्य रोगाची साथ;

आफ्रिकेतून आलेल्या लम्पी स्कीन या जनावरांतील देवीसदृश संसर्गजन्य रोगामुळे जनावरांना ताप येऊन त्वचेवर गाठी होतात. कोरोनाप्रमाणेच परदेशातून आलेल्या या आजारासाठी अद्याप लस उपलब्ध नाही. हा आजार झालेल्या जनावरांपासून माणसालाही संसर्गाचा धोका असल्याने पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे बाजार बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे ४०० जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळल्याने या दोन तालुक्यातील सुमारे २२ हजार जनावरांचे लसीकरण केल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपायुक्त डाॅ. सदाशिव बेडक्याळे यांनी सांगितले.

लम्पी स्कीनवर लस उपलब्ध नसल्याने या आजारावर शेळ्या, मेंढ्यांना देण्यात येणारी लस गाई, म्हशींना देण्यात येत आहे. हा आजार जनावरांसाठी प्राणघातक असला तरी जिल्ह्यात अद्याप लम्पी स्कीनमुळे जनावरांचा मृत्यू झालेला नसल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी जनावरांमध्ये लम्पी स्कीनची साथ आली आहे. या देवीसदृश आजारामुळे जत व सांगोला हे जनावरांचे मोठे बाजार गेल्या दोन महिन्यापासून बंद आहेत.

मिरजेतील जनावरांचा बाजार अद्याप बंद केलेला नाही; मात्र जनावरांची आवक उलाढाल घटली आहे. बाजार बंद ठेवण्याबाबत प्रशासनाचे अद्याप निर्देश नसल्याने मिरजेचा बाजार सुरु असल्याचे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

चाैकट

जनावरांची आवक घटली

मिरजेसह कऱ्हाड, फलटण, सातारा व कर्नाटकातील अथणी, मुडलगी, जमखंडी, बोरगाव, बेळंकी, अंकली येथील बाजारातही म्हैस, रेडा, जर्सी गाय आदी जनावरांची आवक व खरेदी-विक्रीपासून मोठी उलाढाल होते. जनावरांच्या संसर्गजन्य रोगाची साथ रोखण्यासाठी बाजार बंद करून केवळ शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने केली आहे.

Web Title: Contagious disease in animals;