शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र
By Admin | Updated: July 8, 2016 01:01 IST2016-07-07T23:55:39+5:302016-07-08T01:01:47+5:30
संभाजी पवार : साखर सम्राटांमुळे निर्माण होताहेत वाद

शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र
सांगली : शेतकरी संघटनांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखरसम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही चळवळ खिळखिळी करण्याचे षड्यंत्र आहे. शरद जोशी, खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट, रघुनाथदादा पाटील, बाळासाहेब मासुले, संजय कोले, महावीर चव्हाण, बाबू काका सायमोते, एम. के. गुरव, बाळासाहेब कुलकर्णी यासारखे नेते शेतकरी चळवळीत अग्रभागी राहिले. ऊस, दूध यांचे दर, झोनबंदी यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी आंदोलने केली. त्यामुळे बळिराजाच्या जीवनात क्रांती घडली. दहा-बारा वर्षाच्या काळात ऊसदरवाढीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना घामाचे ३२ हजार २५ कोटी रुपये शेतकऱ्यांना हक्काची व जादा रक्कम मिळाली. त्यासाठी शेतकरी नेत्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास, लाठीहल्ला सहन केला.
चळवळीला इतका मोठा इतिहास असताना अचानक संघटनेअंतर्गत मतभेद वाढू लागले आहेत. या संघटनांनी साखरसम्राटांच्या या प्रयत्नांना बळी पडू नये. जोपर्यंत शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. साखरसम्राटांच्या बंदुकीला शेतकरी नेत्यांनी आपला खांदा द्यावा व त्या बंदुकीने दुसऱ्या शेतकरी नेत्यांवर निशाणा साधावा, ही गोष्ट दुर्दैवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शत्रूचा स्वार्थ साधला जाईल. व्यक्ती तितक्या प्रकृती या नैसर्गिक न्यायाने चळवळीतील नेते व संघटना अनेक असणे हे स्वभाविक आहे. मी या सर्वांचा आदर करतो. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले योगदान मोठे आहे. आपापसातील मतभेदांपेक्षा शेतकरी हित जोपासणे हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. या मार्गावर चालणाऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठबळ देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उसाला दर : संघटनांचे यश
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. हे चळवळीला आलेले यश आहे, असे पवार म्हणाले. संघटनांचे हे यश साखर सम्राटांच्या पचनी पडत नसल्यामुळे ते संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत भांडण लावत आहेत. याला शेतकरी फसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.