महापालिकेत संख्याबळाची जुळवाजुळव

By Admin | Updated: January 29, 2015 00:09 IST2015-01-28T22:52:32+5:302015-01-29T00:09:13+5:30

बंडखोरी बेदखल : राष्ट्रवादी, स्वाभिमानीतील सदस्यांना गळाला लावण्याच्या हालचाली गतिमान

Connection in Municipal Corporation | महापालिकेत संख्याबळाची जुळवाजुळव

महापालिकेत संख्याबळाची जुळवाजुळव

सांगली : महापौर, उपमहापौर निवडीवरून महापालिकेत महाभारत रंगले असताना, आता सत्ताधारी काँग्रेसकडून संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. उपमहापौरपदासाठी झालेली बंडखोरी बेदखल करीत गटनेते किशोर जामदार यांनी सारी सूत्रे हाती घेतली आहेत. स्वाभिमानी व राष्ट्रवादीतील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत, तर विरोधी पक्ष चमत्कारावर ठाम असून, त्यांनीही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची ३१ रोजी निवड होत आहे. या पदासाठी सध्या तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र असले तरी, प्रत्यक्ष निवडीवेळी त्यात बदल होणार आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्याने अस्वस्थता आहे. बंडखोर उमेदवारांच्या पतींनी आज गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती संजय मेंढे यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी त्याची फारशी दखल घेतली नसल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. बहुमताचा ४१ चा जादुई आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी गटाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. विरोधी राष्ट्रवादीतील सदस्यांना फोडण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजावून त्यांना पक्षीय बंधनात अडकविले आहे. राष्ट्रवादीने सदस्यांना व्हीप लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही निवडणूक लढविल्याचा निर्धारही विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी बोलून दाखविला. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार असल्याचे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी आघाडीने सदस्यांना व्हीप बजाविल्याची तयारी चालविली आहे. स्वाभिमानीत काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, जनता दल या पक्षांचे सदस्य आहेत. त्यामुळे फुटीची सर्वाधिक शक्यता स्वाभिमानीत दिसून येते. यातील काँग्रेसला मानणाऱ्या दोन अपक्ष नगरसेवकांना व्हीप लागू करण्याबाबत संभ्रम कायम आहे. त्यात भाजपचे तीन सदस्य कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. याबाबत गौतम पवार म्हणाले की, स्वाभिमानीच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने अद्यापही या निवडीच्या व्यूहरचनेबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आमच्याशी कोणत्याही पक्षाने संपर्क साधलेला नसून, आम्हीही कुणाच्या संपर्कात नाही. योग्यवेळी भूमिका घेतली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसचे विवेक कांबळे व प्रशांत पाटील यांनी पक्षासह इतर पक्षातील नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. महापौर, उपमहापौर निवडीवेळी पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. येत्या दोन दिवसात पाठिंब्याचा घोडेबाजार आणखी वाढणार आहे. (प्रतिनिधी)

पतंगरावांचे काय?
आ. पतंगराव कदम यांच्या आदेशाने अर्ज दाखल केल्याचा दावा बंडखोर वंदना कदम यांनी केला होता. त्याबाबत पतंगराव कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. असा कोणताही आदेश पतंगराव कदम यांनी दिला नसल्याचे सांगून गटनेते जामदार यांनी त्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला.



चर्चा मिरज पॅटर्नची
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून मिरज पॅटर्नची चर्चा वारंवार होते. या निवडीत या पॅटर्नचा जोर आहे. महापौरपद मिरजेला मिळणार असल्याने त्याविरोधात काँग्रेसमधून बंडखोरी झाली नाही, तर उपमहापौरपद कुपवाडला दिल्यानंतर मात्र मिरजेतून बंडाला फूस लावल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे विकास कामांबाबत मिरज पॅटर्नची होणारी चर्चा आता राजकीय पटलावर पोहोचली आहे.

Web Title: Connection in Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.