लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहे, अशी टीका करीत काँग्रेस नेत्यांनी शनिवारी सांगलीत धरणे आंदोलन केले.
स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी 'ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे', 'ओबीसींचे आरक्षण संपवणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो' अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात अय्याज नायकवडी, नेमिनाथ बिरनाळे, वहिदा नायकवडी, अण्णासाहेब कोरे, नगरसेवक फिरोज पठाण, अमित पारेकर, आरती वळवडे, वर्षा निंबाळकर, इलाही बारुदवाले, महेश साळुंखे, बिपीन कदम, सनी धोतरे, अजित ढोले, तोफिक शिकलगार, महावीर पाटील, शरीफ सय्यद, अमोल पाटील, आदी सहभागी झाले होते.