जागा वाटपावरून काँग्रेसच्या यादीचा घोळ

By Admin | Updated: July 23, 2015 00:14 IST2015-07-22T23:24:38+5:302015-07-23T00:14:01+5:30

बाजार समिती : जयंत पाटील गटाचे पॅनेल जाहीर; दुरंगी लढत स्पष्ट

Congress's list of seats allocated | जागा वाटपावरून काँग्रेसच्या यादीचा घोळ

जागा वाटपावरून काँग्रेसच्या यादीचा घोळ

सांगली : घटक पक्षांना द्यायच्या जागा आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे सांगली बाजार समितीसाठी काँग्रेसच्या यादीचा घोळ बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही कायम होता. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, जनता दल, जनसुराज्य शक्ती या सर्व पक्षांनी काँग्रेसप्रणित पॅनेलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे जयंत पाटील गटाने जिल्हा बँकेचाच फॉर्म्युला कायम ठेवला. भाजप व राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या असून, काँग्रेसमधील मदन पाटील गटाच्या वाट्याला चार जागा मिळाल्या आहेत. जयंत पाटील गटाचे शेतकरी सहकारी पॅनेल व काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत पॅनेल यांच्यात बाजार समितीसाठी लढत होणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवारी दुपारी संपली. राष्ट्रवादीने मंगळवारीच सर्व पक्षांचे समाधान करीत यादी निश्चित केली होती. बुधवारी दुपारी भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहराध्यक्ष संजय बजाज, विजय सगरे, प्रा. सिकंदर जमादार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेतकरी सहकारी पॅनेलची यादी जाहीर केली.
यादीत राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी सहा, तर मदन पाटील गटाला चार जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या सांगलीतील निवासस्थानी जयंत पाटील गटाची बैठक दुपारी पार पडली. काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत पॅनेलला तिसऱ्या आघाडीने पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेना, जनता दल, जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी आघाडी या पक्षांचा समावेश आहे. सांगलीच्या विश्रामगृहात व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या कार्यालयात दुपारी यासंदर्भातील बैठक पार पडली. जत व कवठेमहांकाळमधील जागांबाबत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही वाद कायम होता. नाराजांची संख्या अधिक असल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पॅनेलच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी चिन्हे वाटपानंतर उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

दादा घराण्यातील संघर्ष टळला
जिल्हा बँकेप्रमाणे बाजार समितीतही मदन पाटील व विशाल पाटील यांच्यात लढतीची चिन्हे दिसत होती. प्रक्रिया गटातून दोघांनीही अर्ज दाखल केले होते. विशाल पाटील यांनी या गटातून उमेदवारी मागे घेतल्याने निवडणुकीतील दादा घराण्यातील संघर्ष टळला आहे. प्रक्रिया गटातून काँग्रेसप्रणित आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुकाध्यक्ष संभाजी मेंढे यांना उमेदवारी
दिल्याने मदन पाटील व मेंढे यांच्यात थेट लढत होईल.
१९ जागांसाठी
७० उमेदवार
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी तीन वाजता संपली. बुधवारी ३७० उमेदवारांनी माघार घेतली असून, निवडणूक रिंगणात १९ जागांसाठी आता ७० उमेदवार राहिले आहेत.

Web Title: Congress's list of seats allocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.