सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:53 PM2022-07-26T12:53:15+5:302022-07-26T12:53:49+5:30

शिंदे गटानेही आता सर्वच तालुक्यात गट वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या

Conflict in Shiv Sena Eknath Shinde group in Sangli district | सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

Next

सांगली : पक्षीय अस्तित्वासाठी राज्यासह जिल्हास्तरावरही शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटातील राज्य व जिल्हास्तरीय नेत्यांनी शिवसेनेच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना प्रवेशाच्या ऑफर दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तातडीने पक्षाकडे प्रतिज्ञापत्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटानेही आता सर्वच तालुक्यात गट वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेला छुपा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर व जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला धक्का बसला. खानापूर व इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा पक्षीय बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याचवेळी या दोन्ही तालुक्यात शिंदे गटाने आपले प्राबल्य राखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यात शिंदे गटाला अद्याप विस्तार करता आलेला नाही. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी संबंधित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. या गोष्टीस शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. या ऑफरचे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत. तरीही शिवसेना व शिंदे गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे.

ऑफर काय आहेत?

सध्याच्या पदापेक्षा मोठे पद, प्रभाग व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. काहींना महामंडळे देण्याच्या बदल्यात पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात आले.

शिंदे गटातून सध्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ऑफर येत आहेत, मात्र त्याला कोणीही बळी पडलेले नाही. दोन अपवादवगळता शिवसेना एकसंध आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कोणताही दबाव नाही. दबाव आला तरीही कोणी बळी पडणार नाही. - संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना
 

इस्लामपुरातील माजी नगरसेविकेच्या पतीला झालेल्या मारहाणीच्या घटनेमागे आमच्या गटाचा काहीही संबंध नाही. ईश्वरपूरच्या नामकरणाच्या विषयावरून हा प्रकार घडला असावा. ज्या शिवसैनिकांना आमच्याकडे यायचे आहे त्यांनी यावे; मात्र ज्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच रहायचे आहे त्यांना तिथे राहण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, एकनाथ शिंदे गट

Web Title: Conflict in Shiv Sena Eknath Shinde group in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.