तडजोडीवरून दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण

By Admin | Updated: December 20, 2015 00:32 IST2015-12-20T00:32:43+5:302015-12-20T00:32:43+5:30

महापालिका सभा : आर्थिक व्यवहारांवरून एकमेकांवर चिखलफेक, दबाव गट हवेतच विरला

The composition of both the Congress from compromise | तडजोडीवरून दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण

तडजोडीवरून दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण

सांगली : महासभेतील गोंधळ नवीन नसला तरी, सत्ताधारी कॉँग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादीला एकाचवेळी स्वकीयांनी घरचा आहेर देण्याची घटना प्रथमच घडली. आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करून काही सदस्यांनी स्वकीयांवरच चिखलफेक केल्याने भरसभेत दोन्ही कॉँग्रेसचे वस्त्रहरण सर्वांनी अनुभवले.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत गोंधळ झाला. गोंधळाबरोबरच एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचा खेळही याठिकाणी रंगला होता. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे वस्त्रहरण केले. त्याचबरोबर विरोधकांचे एका विरोधी नगरसेवकाने आणि सत्ताधाऱ्यांचे एका सत्ताधारी नगरसेवकाने वस्त्रहरण केले. सभेतील गोंधळाबरोबरच हा राजकीय गोंधळही सर्वांना धक्कादायक होता. सभेकडे तटस्थपणे पाहणाऱ्या काही नगरसेवकांचे डोके या राजकारणाने चक्रावले.
गोंधळात सभा गुंडाळण्यात येत असताना सत्ताधारी गटाला त्यांचेच सदस्य असलेले संजय मेंढे यांनी धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने सभेचे कामकाज चालविले जात असल्याची टीका त्यांनी केली. मेंढे यांनी वित्त आयोगाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जोर धरला होता. महापौरांनी त्यांची मागणी झिडकारली. मेंढे यांना स्वत:च्या प्रभागात ६० लाखांची कामे अपेक्षित होती. ३० लाखांची कामे मंजूर केल्यानंतरही त्यांचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणखी आणखी ३० लाखांचा हट्ट होता, असा आरोप महापौरांनी पत्रकारांशी बोलताना केला. मेंढे यांनीही महापौरांना याबाबतचे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.
आर्थिक हितासाठी नव्हे प्रभागातील जनतेच्या प्रश्नांसाठी आपण भांडत असल्याचा दावा मेंढे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
सत्ताधाऱ्यांच्या तंबूला मेंढेंच्या रूपाने आग लागली असतानाच, विरोधी गटातही शुभांगी देवमाने व आनंदा देवमाने यांच्या रूपाने टीकेचा बॉम्ब पडला होता. देवमाने दाम्पत्याने विरोधी पक्षसुद्धा सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाल्याचा आरोप केला. सभा गुंडाळण्यामागे दोन्ही पक्षांची मिलीभगत आहे.
एकमेकांचे हितसंबंध गुंतल्यानेच विषयपत्रिकेवरील विषयांची चर्चा होऊ दिली नाही, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. दोन्ही पक्षांना मिळालेला हा घरचा आहेर महापालिकेत दिवसभर चर्चेत होता. चांगल्या कामांसाठी दबाव आणण्याचा दावा करणारा सर्वपक्षीय दबावगटही हवेतच विरला. सदस्यांच्या भूमिकांविषयीच गोंधळ दिसून आला. (प्रतिनिधी)
 

Web Title: The composition of both the Congress from compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.