महसूल, दुय्यम निबंधकांविरुद्ध वकील संघटनेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:57+5:302021-03-04T04:50:57+5:30

सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना वाळवा, शिराळा वकील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी एस. यू. संदे, ...

Complaint of Advocates Association against Revenue, Secondary Registrar | महसूल, दुय्यम निबंधकांविरुद्ध वकील संघटनेची तक्रार

महसूल, दुय्यम निबंधकांविरुद्ध वकील संघटनेची तक्रार

सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना वाळवा, शिराळा वकील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी एस. यू. संदे, रणजित पाटील, एच. के. पाटील, एन. बी. पवार, सुनील पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील वाळवा आणि शिराळा तालुक्यातील वकील संघटनेने महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली होईपर्यंत पक्षकारांच्या हिताला बाधा होईल असे निर्णय करू नयेत, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभाराची चौकशी करावी, असे ठराव केले. या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आली.

येथील वकील संघटनेच्या सभागृहात वाळवा, शिराळा तालुक्यातील वकिलांची बैठक झाली. यामध्ये उपविभागीय अधिकारी हे महसुली दावे चालविण्यासाठी दिलेल्या वेळेत हजर राहत नाहीत. वकील मंडळींना विनाकारण तिष्ठत ठेवतात. वकिलांशी उद्धटपणे वागून त्यांचा अपमान करतात. न्याय्य निर्णय देण्यास विनाकारण विलंब करतात. त्यांच्या हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजाचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली होईपर्यंत वकील संघटना दावा कामकाज चालविण्यापासून अलिप्त राहणार आहेत, असा ठराव केला.

दुय्यम निबंधक कार्यालयात सावळा गोंधळ व संपूर्ण व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप ठरावाद्वारे केला आहे. वकिलांना मिळकतीचे मूल्यांकन तात्काळ करून दिले जात नाही. दस्त नोंदणीसाठी रात्री-बेरात्री नंबर लावण्यासाठी हेलपाटे मारण्यास लावतात. नोंदणीचे टोकन दिले जात नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

वकील संघटनेचे अध्यक्ष एस. यू. संदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी अ‍ॅड. रणजित पाटील, एन. बी. पवार, एच. के. पाटील, सुनील पाटील, वैभव बोंगाळे उपस्थित होते.

Web Title: Complaint of Advocates Association against Revenue, Secondary Registrar