गोरगरिबांचा कळवळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:54+5:302021-01-13T05:07:54+5:30
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम साहेब हे नेहमीच गोरगरीब लोकांची आस्थेने चौकशी करतात हे मी त्यांच्या सोबत स्वीय ...

गोरगरिबांचा कळवळा
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम साहेब हे नेहमीच गोरगरीब लोकांची आस्थेने चौकशी करतात हे मी त्यांच्या सोबत स्वीय सहायक म्हणून काम करीत असताना सातत्याने अनुभवतोय. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यातील काही प्रसंग आवर्जून सांगावेसे वाटतात.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्यावेळी कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला होता, त्यावेळी लोकांनी काळजी घ्यावी यासाठी साहेब गावोगावी जाऊन जनजागृती करत होते, त्यावेळचा हा प्रसंग. राज्यात आलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे सगळेच चिंतेत असताना त्याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम साहेब यांचा सांगली जिल्हा दौरा होता. सांगलीची जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक आटोपून मंत्री महोदयांच्या गाड्या वसगडे, भिलवडी, अंकलखोप, औदुंबरच्या मळी भागातून जात होत्या. साहेबांच्या चेहऱ्यावरची कोरोना संकटाची आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची चिंता दिसत होती. आमची गाडी जशी पुढे जाईल, तसे विश्वजित कदम साहेब महापुरातल्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी सांगायला लागले आणि म्हणाले, आपले कृष्णा काठचे लोक नुकतेच महापुरातून सावरले आहेत तोपर्यंत आता कोरोनाचं संकट आवासून उभा आहे. पुढे आम्ही पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेलो. लोकांना काळजी घ्या, सोशल डिस्टन्स ठेवा, महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, असे साहेब आवर्जून आणि कळवळ्याने सांगत होते.
राज्यात सरकार आल्यापासून साहेबांनी पलूस, कडेगावच्या विकासासाठी जिवाचं रान केलंय; पण अचानक येणाऱ्या अशा परिस्थितीने सर्वसामान्य जनतेचं सगळं आर्थिक नियोजन कोलमडून जातंय अशी खदखद साहेबांच्या बोलण्यातून सातत्यानं जाणवत होती. साहेब याच विचारात मग्न होते, एवढ्यात अमणापूरच्या ग्रामपंचायतीने बनवलेला हात साबणाने स्वच्छ करा हा उपक्रम पाहिला आणि आपले लोक किती लढवय्ये आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखविली.
यानंतर गाड्यांचा ताफा पलूस तालुक्याची हद्द ओलांडून कधी कडेगाव तालुक्याच्या हद्दीत गेला हे चालकासह
आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. कारणही तसंच होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे पोटपाट पाण्याने तुडुंब भरून चालले होते. पूर्वी पलूस तालुका सधन आणि कडेगाव तालुका दुष्काळी भाग होता; पण डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या प्रयत्नाने कडेगाव तालुक्यातही हरितक्रांती झाली आहे. कडेगाव तालुक्यात ऐन उन्हाळ्यात पाण्याचे पाट पाहून विश्वजित कदम साहेबांच्या मनात डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या आठवणी दाटुन आल्या. साहेबांच्या कार्यकर्तृत्वाने घाटमाथ्यावर हरितक्रांती झाली असे सांगत असताना विश्वजित कदम साहेब यांच्या डोळ्यात साहेबांच्या आठवणींचे अश्रू तरळताना दिसत होते. याच वेळी कोरोनाच्या संकटातून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठीच्या विचारांचे काहूरही त्यांच्या मनात चालू होते.
इतक्यात आमचा वांगी आणि शिवणी या दोन गांवातील प्रवास झाला. ऐन उन्हाळ्यात तेथील पिके अशी दिमाखदारपणे डोलत होती. शिवणी गावचे पोलीस पाटील आपल्या मुलांसहित शेतातील गहू कापत होते. आज माणसे शेतात कामाला येऊ शकत नाहीत हे त्यांचं वाक्य ऐकून साहेब फारच भावुक झाले होते. रोजगार करून पोट भरणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचे काय, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला व त्यांनी सर्व गोरगरीब लोकांना मदतीचे किट देण्याचा निर्णय घेतला. शेतात असणारी पोलीस पाटलांची मुलं विश्वजित कदम साहेबांना हात करत होती. साहेबसुद्धा त्यांना हात करून जणू कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एक प्रकारे बळ देत होते. यावेळी साहेबांच्या जिवाची चाललेली घालमेल आम्हाला सर्वांना जाणवतं होती. या परस्थितीत काय करता येईल, कसा मार्ग काढता येईल, या विचाराने ते फार बेचैन झाले होते.
यावेळी रस्त्यावर भेटणाऱ्या चिंचणी आणि कडेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांना तुम्ही स्वतःची काळजी घ्या, लोकांनाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, असे हळव्या मनाने सांगत होते. आम्ही तुमची परस्थिती समजू शकतो, ही आपली माणसं सांगितलं की ऐकतात, एकदा समजून सांगा, तुमचं ती नक्कीच ऐकतील, असा खात्रीपूर्वक शब्द साहेब पोलिसांना देत होते. ते सर्वजण समाधानाने साहेबांना हो म्हणत होते आणि नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी काम करत होते. प्रवासात साहेब मतदारसंघातील अनेकांना फोन करत होते काळजी घ्या, घराच्या बाहेर पडू नका, लहान मुलांना जपा, थोड्या दिवसांत परिस्थिती सुधारेल. काही लागले तर सांगा, मी कडेगावातच आहे, असा आधार सर्वांना देत होते.
कोरोनासारख्या रोगाला हरवायचे असेल तर काही गोष्टी तर पाळल्याच पाहिजेत. केंद्रातील सरकार असो वा राज्यातील सरकार, जे काही निर्बंध आणत आहेत, ते आपल्या सर्वांच्या हितासाठीच आणत आहेत ही भूमिका साहेब सर्वांना पटवून देत होते. पुढे गाड्या नेवरी मार्गे कडेगावकडे जात होत्या. भिकवडी खुर्द फाट्यावर अचानक अत्यावश्यक सेवा विटा कोल्हापूर मुंबई भाजीपाला असा बोर्ड लिहिलेली एक छोटी मालवाहतूक गाडी साहेबांना दिसली. साहेबांनी आपल्या गाड्या जाग्यावरच थांबवल्या. काय रे, कुठे फिरताय, कुठल्या गावचं तुम्ही, नाव काय तुमचे, असे त्या गाडीतील मुलांना विचारताच ती मुलं बोलू लागली. मी सूरज गुरव. येतगावचा आहे. काही नाही, भिकवडी गावात कलिंगड विकाय गेलतो, असं त्यांनी सांगताच साहेबांनी विचारले, बाळा कशी विकली कलिंगड. त्याने उत्तर दिले, साहेब, पाच रुपये, दहा रुपये. बरं मला दोन विकत दे, असे म्हणताच ती मुलं म्हणाली, ‘साहेब, लागतील तेवढी घ्या, दहा टन माल शेतात तसाच पडलाय.’
या त्याच्या बोलण्याने साहेब फारच दुःखी झाले. जबरदस्तीनेच मुलाच्या हातात पैसे देऊन गाडीत बसले. शहरात ६०-७० रुपयांनी विकली जाणारी कलिंगड कवडीमोल दराने ती मुलं विकून आली होती, असे शब्द साहेब पुटपुटत होते. दहा टन माल ती मुलं कशी विकणार, अशा अनेक प्रश्नांनी साहेब खूप बेचैन झाले होते. जड अंत:करणाने साहेब बोलत असतानाच गाड्या कडेगावकडे चालल्या होत्या. दिवसभरातील मळीभाग, द्राक्षाच्या बागा, शिवणीच्या पोलीस पाटलांची मुलं, येतगावचा तो सूरज आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या लोकांना मदत करण्याची धडपड असणारे साहेब, त्यांची ती कळकळ, या सगळ्या प्रसंगाने मन मात्र सुन्न झाले होते.
लेखक : सचिन सावंत
स्वीय सहायक डॉ. विश्वजित कदम