सांगली : करंजी ( जि. अहमदनगर) येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्याधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी मंगळवारी आरोग्य केंद्रातच आत्महत्या केली. याला जबाबदार वरिष्ठांवर कारवाईसाठी राज्यभरातील समुदाय आरोग्याधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.सांगलीत संघटनेने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.डॉ. शेळके यांनी अहमदनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची संघटनेची तक्रार आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वरिष्ठांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हंटले आहे.
त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करुन शेळके यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा असे संघटनेने निवेदनात म्हंटले आहे. तीन दिवसांत कार्यवाही झाली नाही तर राज्यातील सर्व आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्याधिकारी काम बंद आंदोलन करतील असा इशाराही दिला आहे.सांगलीत निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर, उपाध्यक्ष डॉ. सचिन गायकवाड, डॉ. अनिल तेली, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. प्रशांत गोरे, डॉ. अक्षय बारसिंग, डॉ. अमोल वाघमोडे, डॉ. प्रदीप अनुसे, डॉ. विनय आपटे आदी उपस्थित होते.