जयंतरावांच्या ‘कार्यक्रमा’साठी विरोधक एकत्र

By Admin | Updated: October 26, 2016 23:33 IST2016-10-26T23:33:33+5:302016-10-26T23:33:33+5:30

इस्लामपूर नगरपालिका निवडणूक : विकास आघाडीचा झेंडा; निशिकांत पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

Combined opponents for Jayantrao's program | जयंतरावांच्या ‘कार्यक्रमा’साठी विरोधक एकत्र

जयंतरावांच्या ‘कार्यक्रमा’साठी विरोधक एकत्र

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत अखेर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात सगळे विरोधक एकत्र आले. बुधवारी विरोधकांच्या विकास आघाडीची घोषणा करून निशिकांत भोसले—पाटील यांना नगराध्यपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बुधवारी येथे विकास आघाडीच्या मनोमीलनाची आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ठरविणारी अंतिम बैठक झाली. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह नानासाहेब महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे विक्रम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, बाबा सूर्यवंशी, रणधीर नाईक, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, एल. एन. शहा, काँग्रेसचे वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर सर्वांनी पत्रकार बैठक घेतली.
सदाभाऊ खोत म्हणाले, इस्लामपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीविरुध्द पूर्ण ताकदीने लढण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम, खा. रामदास आठवले या सर्व वरिष्ठांशी बोलणे झाले आहे. त्यांनी या आघाडीला पाठिंबा दिला आहे. शहराचा सर्वांगीण विकास हेच विकास आघाडीचे उद्दिष्ट आहे. उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि ध्येयवेडेपणाने कामाचा पाठपुरावा करणारा कामगार आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ता, निशिकांत पाटील यांच्यारूपाने विकास आघाडीला मिळाला आहे. त्यामुळे यावेळचे मैदान आम्ही मारणारच.
नानासाहेब महाडिक म्हणाले, खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आघाडी सक्षमपणे लढेल. यावेळची तगडी फाईट ‘कुडता फाडके’ होईल.
निशिकांत पाटील म्हणाले, २२ वर्षे आमदार जयंत पाटील यांच्याबरोबर निष्ठेने काम केले. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी शहरासाठी कोट्यवधींचा निधी दिला. मात्र त्या निधीचा विनियोग सत्ताधाऱ्यांनी शहराच्या विकासासाठी केला नाही. परिवर्तनासाठी राष्ट्रवादीतून उमेदवारी मागितली. मात्र त्यांच्याकडून न्याय मिळणार नाही याची खात्री पटल्याने, विकास आघाडीत प्रवेश करीत आहे.
पाटील म्हणाले, नागरिकांनी ३१ वर्षे जी चूक केली, तसा पश्चाताप होणार नाही, असा कारभार करुन दाखविताना शहराला विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला आणू.
विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी निशिकांत पाटील यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत शहरात परिवर्तन करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रणधीर नाईक म्हणाले, निशिकांत पाटील यांच्यारूपाने तगडा उमेदवार मिळाला आहे. पूर्ण ताकदीने लढून सत्तापरिवर्तन करू.
नगरसेवक विजय कुंभार यांनी स्वागत केले. राहुल महाडिक यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक कपिल ओसवाल, विजय पवार, अजित पाटील, महेश पाटील, विकास देशमुख, भागवत जाधव, भास्करराव कदम, सयाजीराव पवार, अरुण कांबळे, सनी खराडे, घन:श्याम जाधव, गाईड कांबळे, समीर आगा उपस्थित होते. (वार्ताहर)


दुचाकी रॅली : शक्तिप्रदर्शन होणार
विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झालेले निशिकांत पाटील आघाडीच्या सर्व नेत्यांसमवेत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजी चौकातून मोटारसायकल रॅली काढून पाच हजाराहून अधिक कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे.


शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात...
विकास आघाडीतील सहभागाबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, निवडणूक लढविण्याबाबत पक्षनेतृत्वाकडून अद्याप आदेश मिळालेले नाहीत असे स्पष्ट करीत, अधिक बोलणे टाळले.


इस्लामपूर येथे विकास आघाडीच्या बैठकीत (डावीकडून) राहुल महाडिक, विक्रम पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निशिकांत भोसले—पाटील, नानासाहेब महाडिक, रणधीर नाईक, बाबासाहेब सूर्यवंशी, सम्राट महाडिक या नेत्यांनी हात उंचावून एकी दर्शविली.

Web Title: Combined opponents for Jayantrao's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.